जुठन / उष्टं !!


2 दिवसांपूर्वी ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या "जुठन" नामक आत्मकथनाचा मराठी अनुवाद 'उष्टं' वाचून पूर्ण केलं.मराठी भाषेतील उपरा,बलूतं, उचल्या,अक्करमाशी भंगार,कोल्हाट्याचं पोरं किंवा भंगार या धाटणीतल्या किंवा दलित साहित्यात मोडणारं आणि याच पंगतीत बसणार हे पुस्तक प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायला हवंच.वाचून मनन,चिंतन करून आजसुद्धा परिवर्तनाची गरज आहे हे स्वीकारायला हवं.हिंदू समाजातील भंगी जातीत जन्माला आलेल्या 'ओमप्रकाश वाल्मिकी' यांच हे एक हृदय पिळवून टाकणारं आत्मकथन आहे.
समाजात पावलोपावली मिळालेली हीन वागणूक,उपेक्षा,जातीयभेदाचे तीव्र चटके,असमानता आणि नशिबी आलेलं 18 विश्व दारिद्र्याचे विविध अनुभव त्यांनी आपल्या या पुस्तकात मांडलेले आहेत.हे पुस्तक वाचकाच्या मनावर,हृदयावर घाव करून जाते.वाचकाला कमालीचं अस्वस्थ करते,धाय मोकलून रडायला भाग पाडते.तर सरळ सरळ समाजाच्या संकुचित विचारसरणीवर प्रहार करते.

सर्वप्रथम या पुस्तकाबद्दल मला Ncert च्या एका पुस्तकांतून माहिती मिळाली.यातील एक प्रसंग वाचून फारच वाईट वाटलं.आणि तेव्हा लगेच हे पुस्तक आवर्जून वाचायचं ठरवलं. लगेच ऑनलाइन चेक केलं.मुळ हिंदी बोलवत होतो तशातच या पुस्तकाचा मराठी अनुवाद 2018 साली लोकवाड्मय कडून आलंय हे समजलं म्हणून मी हिंदी न बोलवता मराठी बोलावलं.1994 साली प्रकाशित झालेल्या या हिंदी पुस्तकाचं डॉ.मंगेश बनसोड यांनी केलेलं मराठी अनुवाद खूपच सुरेख आणि वाचनीय झालेला असून आपण अनुवादित पुस्तक वाचतोय असं अजिबात वाटतं नाही.'भंगी’ समाजाच्या जीवनावर आधारित अत्यंत भेदक वास्तव ‘उष्टं’ च्या निमित्ताने माझ्या पुढं आलं.

जे वाचून मी खरंच सुन्न झालोय.

दलित जीवनातील दु:ख असह्य आणि वेदनादायक आहेत.लेखक आजही ज्याला उच्च जातीचे काही छोट्या विचारसरणीचे लोक शिवी म्हणून वापरतात (डोम, चमार, मेहतर, भंगी किंवा चुहरा). अशा वर्णात किंवा जातीत जन्माला आले होते, या वर्णात जन्माला येणे ही त्या काळी भारत देशात सर्वात मोठी चूक मानली जात होती.जेथे दलित कुटुंबातील लोकांना माणूस मानले जात नव्हते.जनांवरापेक्षा सुद्धा वाईट त्यांना वागणूक मिळत होती.संविधान स्वीकार केल्यानंतर लागू करून असंख्य वर्षे लोटली तरी हा चित्र आपल्या देशात नजरेस पडत होता आणि सुद्धा वेगवेगळ्या बातम्या मध्ये काही घटना बघून त्याचा अंदाजा येत असतो.
दलिताची व्यथा काय असते ? हे ‘जुठण’/उष्टं या आत्मचरित्रातून अत्यंत मार्मिक पद्धतीने व्यक्त करण्यात आले आहे.

यातील कितीतरी प्रसंग वाचत असताना अंगावर काटा उभा राहतो.कोणताही संवेदनशील माणूस शरमेने आपली मान खाली घालेल असले लाजिरवाणे जिणे दुसऱ्याला जगण्यास भाग पाडणारे लोक किती खालच्या पातळीवरचे तकलादू आहेत , याचा प्रत्यय आपणाला तेव्हा येतो , जेव्हा हे ' महाशय डुकराचे मटण खायला मजलुमांच्या वस्तीत आपलं सर्वश्रेष्ठ ' तोंड लपवत जातात आणि नेहमीच कोवळ्या डुकराच्या पिलांची मागणी करतात.यातील असे कितीतरी प्रसंग वाचताना अक्षरशः किळस येते.काय बोलावे ?काय व्यक्त व्हावे ?हेच समजतं नाही.कितीतरी प्रसंग वाचून माणूस म्हणून घेण्याची लाज वाटते.उत्तर प्रदेशमधल्या मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या छोट्याशा गावात ‘भंगी’ म्हणून जन्मास आलेले ओमप्रकाश वाल्मिकी यांनी अत्यंत वाईट आणि अशा व्यवस्थेत पहिला श्वास घेतला. भंगी समाज उत्तर प्रदेशसारख्या हिंदी राज्यात ‘वाल्मिकी’ म्हणून ओळखला जातो.गावकुसाच्या बाहेर जेथे गावातील लोकं मल-मूत्र विसर्जनासाठी येतात त्याचं गावाच्या एका नाल्या किनारी भंगी समाजाची वस्ती होती.आणि याचं वस्तीत लेखकाचं बालपण गेलं होतं.लेखकाचं संपूर्ण कुटुंब मिळेल ते काम करत असे जे इतर समाजासाठी तुच्छ होतं. दोन वेळेचे खायचे वांदे असलेल्या त्यांच्या कुटुंबात वाल्मिकी यांनी पुढे शिकायचं निर्णय घेऊन परिवर्तनाची कास धरली होती.पण त्यांचा प्रवास अजिबात सोप्पा नव्हता.त्यांना पावलोपावली जातीय भेदाचा सामना करावा लागला. भेदभाव,असमानता आणि तुच्छ वागणुकीच्या सामोरे जावे लागले.कितीतरी भयानक, वेदनादायी आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या प्रसंगाना त्यांना तोंड द्यावे लागले.

लोकनाथ यशवंत म्हणतात :-

माणसाचे जेव्हढे शोषण जाती - धर्माच्या भंकस नावाखाली सर्वश्रेष्ठ वगैरे संस्कृती असलेल्या आपल्या देशात करण्यात आले.तेवढे जगात कुठेही झाले नाही . स्वतःच्याच तोंडाने स्वःतला उच्च वगैरे म्हणवून घेणाऱ्या तथाकथितांनी निसर्गाने दिलेले मुबलक पाणीही आपल्या मर्जीने , तहानलेल्यांना विहिरीवर तासन्तास ताटकळत उभे ठेवून , मजलुमांच्या जीवाचा शेवट पाहिला . साक्षात माणसामाणसांत भेद करून सनातनी सडलेल्या मनोवृत्तीची ही विष्ठा पिढ्यान् पिढ्या डोक्यावर वाहून नेण्यास ज्यांना बाध्य केले गेले , त्या बांधवांचे हे शिलालेखीय दगडी वास्तव ओमप्रकाश वाल्मिकीजींनी आपल्या ' जूठन या स्वकथनातून शब्दबध्द केले आहे . तथाकथितांनी  आपल्या अस्तित्वासाठी साध्याभोळ्या लोकांची जी गुलाम मानसिकता तयार केली,'जुठन' त्याचा आरसा आहे , जो आपलाच विद्रूप चेहरा आपणाला स्पष्ट दाखवितो..

आवर्जून वाचा...❤️

©️Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼