शेअर बाजार जुगार ?छे, बुद्धिबळाचा डाव ! 😎


मी जेव्हा Scam 1992 ही हर्षद मेहतावरील वेबसिरिज बघितली तेव्हा "शेअर बाजार " ही नेमकी काय भानगड आहे ?हे थोडंफार समजलं होतं.पूर्वी हर्षद मेहता आणि त्याने केलेल्या स्कॅम बद्दल वाचलेलं होतच.पण तेव्हा ह्या "शेअर बाजारबद्दल " कधी जास्त माहिती करून घेण्याचं प्रयत्न केलं नव्हतं.पण ही सिरीज बघून आपल्याला याबद्दल आयडिया असायला हवी.कुठल्याही गोष्टीचं असलेलं ज्ञान कधीही वाया जात नाही हे ठरवून याबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली.युट्यूब वरील काही व्हिडिओस बघून थोडं फार समजलं पण मला एकदम बेसिक पासून हे सर्वकाही समजून घ्यायचं असल्याने मी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केली.युट्युब, Udemy वगैरे होतेच पण मला जवळचा पर्याय हवा होता.आता आपल्या सर्वांत जवळचा आणि विश्वासू पर्याय म्हणजे पुस्तकंच ते सुद्धा आपल्या माय मराठीतील.❤️

मग काय मराठीत उपलब्ध असलेल्या काही पुस्तकांचा शोध घेतला आणि त्यापैकी हे एक पुस्तक निवडलं आणि वाचून काढलं.फक्त वाचलंच नाही तर समजून-उमजून घेऊन त्यावर अभ्यास केला.या पुस्तकातून माझ्या मनात असलेले शेअर बाजारासंबंधित सर्वकाही प्रश्नांची उत्तरे मला अगदी सोप्या आणि साध्या भाषेत मिळाली.आता पुढे एकदा परत वाचून महत्वपूर्ण नोटस काढून ठेवल्या तर आपण हर्षद मेहता बनायला मोकळे.😅या पुस्तकाची खासियत म्हणजे लेखकांनी अगदी हसत खेळत आपल्याशी संवाद साधत आपले Doubts दूर केले आहेत.हे पुस्तक वाचताना कोठेही कंटाळा जानवत नाही की 
कुठलीही  संकल्पना किचकट वाटतं नाही.लेखकांची लेखनशैली अफलातून असून जणू ते समोर बसून आपल्याला शिकवत आहे असं हे पुस्तक वाचत असताना वाटते.

शेअर्स म्हणजे काय ? ते मिळतात कुठे ? चांगले शेअर्स नेमके ओळखायचे कसे ? त्यांच्या खरेदीची व विक्रीची योग्य वेळ कोणती ? इन्ट्रा - डे आणि डिलिव्हरी व्यवहारांतील खाचाखोचा कोणत्या ? कंपनीची कार्यक्षमता नेमकी कशी जोखायची ? ताळेबंद व नफा तोटा पत्रक कसे वाचायचे ? एखादी कंपनी उद्यासुद्धा फायद्यात राहील की नाही , हे इंटरनेटवरील उपलब्ध माहितीवरून आजच ओळखायचे कसे ? त्यादी माहिती असायलाच हवा आपल्या साऱ्या शंकांचे अत्यंत सोप्या शब्दांत निरसन करणारे मराठीतील एकमेव सचित्र पुस्तक असेल कदाचित.

एकूण 15 प्रकरणातुन हे पुस्तक पुढं जात राहतं. 
जुगार की बुद्धीबळाचा डाव ? या पहिल्याच प्रकरणात लेखक आपल्या मनात असलेले शेअर बाजाराबद्दलचे सर्वकाही गैरसमज/पूर्वग्रह दूर करून आपल्याला कमालीचं मार्गदर्शन करतात.शेअर्स म्हणजे असते तरी काय ? या प्रश्नांच्या उत्तरापासून तर चांगले शेअर्स कोणते ?ते कसे खरेदी करायचे ?आणि ते नेमके विकायचे कसे इत्यादी शेकडो प्रश्नांची उत्तरे देतात.

खाली दिलेली अनुक्रमणिका वाचून व लेखकांच्या मनोगतातील काही मुख्य अंश वाचूनच आपल्या हे पुस्तक नेमकं कसं असेल याची प्रचिती येते..

1)जुगार की बुद्धिबळाचा डाव ? 
2)शेअर्स म्हणजे असते तरी काय ? 
3)इन्ट्रा - डे व डिलिव्हरी 
4)ब्रोकरेज , टॅक्सेस आणि इतर छुपे खर्च 
5) सेन्सेक्स आणि निफ्टी 
6)नावाप्रमाणेच सोपा ' ईझी ट्रेड '
7)मार्केट कोसळत असता ' कमाई '
8) पसंत आहे - बँक ! 
9)शुद्ध बीजापोटी , फळे रसाळ गोमटी ! 
10) अनंतहस्ते कमलावराने ... 
11)गुप्त खजिन्याचा सांकेतिक नकाशा 
12)चुचकारल्यावर काम करणारा कॉम्प्यूटर ! 
13) BSE वेब पेज अलिबाबाची गुहा.
14)बाजारभाव चढण्याचा / पडण्याचा होरा 
15पाचा उत्तरांची कहाणी - सुफळ संपूर्ण ! 

लेखकांच्या मनोगतातील काही अंश,
लेखक म्हणतात :-

नैतिक - अनैतिकतेच्या पूर्वापार कल्पना मोकळ्या मनाने तपासून आणि प्रसंगी त्यांतील कालबाह्य कल्पना झुगारून देऊन गुंतवणुकीचा एक भला चांगला मार्ग म्हणून आपण अजूनही शेअर बाजाराकडे निर्मळ मनाने पाहू शकत नाही , हीच आपली खरी अडचण आहे . ही अडचण दूर केली तर गल्लोगल्ली छोटे छोटे ' वॉरेन बफे ' निर्माण होतील आणि त्यासाठी हे पुस्तक उपयोगी पडेल , अशी मी आशा करतो . मी प्रयत्नपूर्वक ही सारी माहिती इंटरनेटवरून जमा केली , समजून घेतली . माझी मोठी बहीण सध्या प्रॅक्टिस करत नसली तरी ती चार्टर्ड अकाउंटंट असल्याने तिच्याकडून घरच्या घरी अनेक शंकांचे निरसन करून घेतले . आयुष्यात कधी नव्हे ते घरी तासन्तास ' मनी मॅटर्स'ना वाहिलेल्या चॅनल्सकडे एकटक डोळे लावून बसलो , मगाशी सांगितले तसे क्लासमध्येही अत्यंत ' सिन्सिअर्ली ' हजेरी लावली , स्वतःचे डिमॅट खाते उघडून , अनेक व्यवहार करून , प्रत्यक्ष फायदा - तोटा कसा होतो ते पाहिले आणि मगच लेखणी हातात धरली ; हे सारे जरी खरे असले तरीही , ' वत्सा , तू बरोबर आहेस , ' असे सांगणारी कोणी तरी अधिकारी व्यक्ती पाठीशी लागतेच . माझ्या सुदैवाने , NSE चे कोर्सेस पास केलेल्या उच्चशिक्षित आणि पुण्यातील एका नामवंत शेअर - ब्रोकरकडे याच व्यवसायात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या , अत्यंत अनुभवी अशा सौ . सविता तिखे यांनी शेअर बाजाराविषयीचे आणि शेअर्स खरेदी - विक्री व्यवहारासंबंधीचे माझे सारे लिखाण अत्यंत आस्थेने व बारकाईने तपासून दिले आहेत.

तर पुस्तक लिहिण्यामागच्या भूमिकेबद्दल लेखक म्हणतात :-

 मी हे पुस्तक लिहिण्यास उद्युक्त झालो ; याचे कारण , एखादे लॉटरीचे तिकिट विकत घ्यावे तशा निष्काळजीपणे शेअर्स खरेदी करणारी आणि कष्टाने कमावलेल्या पैशांची धूळधाण करणारी अनेक माणसे मला अगदी जवळून पाहायला मिळाली . ' तुम्ही ते शेअर्स का घेतलेत ? ' असे त्यांना विचारले तर त्यांतल्या कोणालाच त्या प्रश्नाचे धड उत्तर देता येत नसे . अर्थात त्यांनी काही थातूरमातूर उत्तर दिले असते तरी ते बरोबर आहे की चूक हेही मला तेव्हा सांगता आले नसते , हा भाग अलहिदा ! पण तरीही तशा आंधळेपणाने खरेदी केलेल्या शेअर्समधून त्यांचे कोणाचेही भले होणे शक्य नव्हते ; हे मात्र तेव्हा स्वतः एकही शेअर विकत न घेतासुद्धा मला चांगलेच समजत होते . पण ' थोडा तरी अभ्यास करून शेअर बाजारात उतरा , ' असा त्यांना नुसताच कोरडा उपदेश करूनही फारसा उपयोग नव्हता ; कारण त्यांनी खरोखरच अभ्यास करायचे मनात आणले असते तरी शेअर बाजाराचा अभ्यास कसा करायचा असतो? हे दाखवणारी किंवा त्यांच्याकडून तसा अभ्यास करवून घेणारी पुस्तके मराठीमध्ये उपलब्धच नाहीत . शेअर मार्केटसंबंधी इंग्रजी भाषेमध्ये छापील पुस्तकांच्या स्वरूपात आणि इंटरनेटवरही अक्षरश : अमाप माहिती उपलब्ध आहे . उपयुक्ततेच्या बाबतीत थोडीही तडजोड न करता , अत्यंत आकर्षक पद्धतीने ती सारी माहिती अशा पुस्तकांत आणि इंटरनेटवर दिलेलीही असते . पण इंग्रजी म्हटले की आपल्यातले निम्म्याहून अधिक लोक लगेच काढता पाय घेतात . थोडाफार धीर धरून जे कोणी उभे राहतात , त्यांचीही दैनंदिन सवयीअभावी इंटरनेटवर शोधाशोध करताना चांगलीच दमछाक होते ; आणि मग कंटाळून तेही तो नाद सोडून देतात .

तिसरा मार्ग कोचिंग क्लासचा ! तसे शेअर बाजारासंबंधी अनेक क्लासेसही आहेत . शेअर व्यवहारावर स्वतःच पुस्तक लिहायचे असे ठरवल्यावर , अशा वर्गामध्ये नेमके शिकवतात तरी काय , याची पाहणी करण्यासाठी मी भरमसाठ फी भरून एका नामांकित संस्थेच्या क्लासमध्ये चक्क नाव नोंदवून , दहा दिवस रोज अडीच - तीन तास वाया घालवूनही आलो . ' वाया घालवून आलो ' असे म्हणायचे कारण बहुतेक सर्व व्याख्याते सत्यनारायणाची पोथी सांगावी तशी पाट करून आलेली सारी सार्थ- निरर्थ माहिती तीन तासांत धडाघडा सांगून मोकळे व्हायचे . आर्थिक बहुतेक गुंतवणुकीचा सल्ला देणाऱ्या कोणत्या ना कोणत्या तरी व्यावसायिक संस्थेशी त्यांतील व्याख्यात्यांचा घनिष्ठ संबंध होता , त्यामुळे ते आमच्याकडे विद्यार्थी म्हणून न पाहता संभाव्य ' ग्राहक ' म्हणून पाहत होते . त्यांतले एक - दोन व्याख्याते तर त्याच्याकडे असलेल्या एजन्सीचे सॉफ्टवेअर आमच्या गळ्यात मारू पाहत होते . थोडक्यात म्हणजे , आमचे आम्ही काही शिकून शहाणे व्हावे , स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम व्हावे , हे त्यांना बहुधा अपेक्षितच नव्हते . आम्ही नवे काही शिकण्यापेक्षा त्यांच्या ज्ञानाने दिपून जाऊन त्यांच्यावरच विसंबून राहावे , त्यांचा उद्देश आणि प्रयत्न होता की काय , तेच जाणोत ! मी हे त्या एका विशिष्ट क्लासपुरतेच सांगतो आहे , पण इतरांचीही गोष्ट फारशी वेगळी असेल , असे मानायचे काही असाच खास कारण नाही . पण कदाचित त्यामुळेच या साऱ्या त्रुटी दूर करून सर्वसामान्य माणसाला शेअर्सचा अभ्यास कसा करायचा असतो , त्याची किमान दिशा दाखवणारे तरी पुस्तक आपण मराठीत लिहायचेच , हा माझा निश्चय अधिकच पक्का झाला . निदान एवढ्यापुरती तरी मी त्या क्लासची भरलेली फी वाया गेली नाही , हे अगदी खरे ! 

शेअर बाजाराकडे बघण्याचा सर्वसामान्य मराठी माणसाचा दृष्टिकोन अजूनही बराचसा पूर्वग्रहदूषितच आहे . हा एक प्रकारचा जुगारच आहे . असेच अजूनही बरेच जण समजतात आणि आजही बहुसंख्य लोक ज्या पद्धतीने त्यात गुंतवणूक करतात , ती पाहता त्या शेअर बाजारापासून परावृत्त करायचे सोडून , उलट त्या मार्गावरील भक्कम आधारही मिळतो . त्यामुळे माझ्याकडे असलेल्या लेखन कौशल्याचा वापर करून मी लोकांना शेअर बाजारापासून परावृत्त करायचे सोडून,उलट त्या मार्गावरील खाचखळगे कसे टाळायचे हे दाखवून त्यावरून मार्गक्रमण करण्यास त्यांना प्रवृतच करतो आहे.

शेवटी ,

 वाचकांना शेअर बाजाराची काहीच माहिती नसेल असे गृहीत धरून अगदीच श्रीगणेशापासून सुरुवात केल्यामुळे शेअर बाजारासंबंधित सर्वच गोष्टींची मांडणी या छोटेखानी पुस्तकात मावणेच शक्य नाही . त्यामुळे हे पुस्तक परिपूर्ण आहे , असा माझा अर्थातच दावा नाही . पण या पुस्तकाद्वारे विचारांना चालना व दिशा देण्यात आणि शेअर बाजारात उतरण्यासाठी मी बऱ्याच अंशी यशस्वी आवश्यक असलेली किमान माहिती व ठरेन , याची मात्र मला पूर्ण खात्री आहे . या पुस्तकात मानसिक बळ पुरवण्यात समाविष्ट करता न आलेले ऑप्शन्स फ्युचर्स , टेक्निकल अॅनालिसिस आणि म्युच्युअल फंड यांसारखे विषय आपण या पुस्तकाच्या पुढच्या भागात अभ्यासणार आहोत.

शेअर बाजार समजून घेण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी हा अनुभव माहितीसाठी...❤️🙂

©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼