एक होता कार्व्हर ❤️
रात्री पुन्हा एकदा "एक होता कार्व्हर "या अप्रतिम व जीवनाला एक नवीन दिशा देणाऱ्या या पुस्तकाचा प्रवास समाप्त झाला.पुन्हा नव्याने काही समजलं,उमजलं आणि खूप काही गवसलं.हे पुस्तक मागे मी लॉकडाऊन मध्ये वाचलेलं होतंच. पण काही दिवसांपूर्वी या पुस्तकाची 47 वी आवृत्ती आली. त्यामुळे मी नव्याने हे पुस्तक पुन्हा वाचायला घेतले.पण या वेळेस मी माझ्या संग्रही असलेली पूर्वी वाचलेली 42 वी आवृत्ती न वाचता चक्क एप्रिल 1981 साली आलेली पहिली आवृत्ती वाचून काढली.
जॉर्ज कार्व्हर यांचा जीवन प्रवासच असा आहे की जो कितीही वेळा वाचला तरीही तो परत परत वाचावं असं वाटतं असतं.प्रत्येक वेळी यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं एवढं नक्की.आतापर्यंत तरी दोन वेळा हे पुस्तक मी वाचलं आणि भविष्यात पुन्हा मी वेळोवेळी हे पुस्तक वाचत राहणार आहे.
तसे तर याबद्दल लिहायला किंवा बोलायला खुप काही आहे. जे सर्वांना ठाऊक आहेच.आजपर्यंत या पुस्तकाबद्दल खूप काही लिहलं गेलं आहे.असंख्य वाचकांच्या मनांवर या पुस्तकाने गारुड केलं आहे.अनेकांनी या पुस्तकाची पारायणे केलेली आहे.कोणत्याही पुस्तकाची 47 वी आवृत्ती येणे ही फार मोठी उपलब्धी आहे.4 दशकापासून शेकडो वाचकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या पुस्तकाचे हे फार मोठे यश आहे.यासाठी लेखिका वीणा मॅमचे खूप खूप अभिनंदन.
काही निवडक पुस्तके अशी असतात, जी एकंदरीत आपल्या जीवनावर खूप प्रभाव टाकून जात असतात.आपल्या आयुष्याकडे बघण्याचा आपला एकंदरीत दृष्टिकोन बदलत असतात.तशाच पुस्तकापैकी हे एक पुस्तक आहे.हे पुस्तक आपल्याला आपल्या आयुष्याकडे बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन देऊन खूप काही नवीन शिकवून जाते, जी शिकवण आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावणारी ठरते.आपल्या आयुष्यातील समस्या,दुःख हे किती फुटकळ आहेत.याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचून येते.यातील प्रत्येक प्रकरण आपल्याला झपाटून टाकतो,आयुष्यात आलेल्या कठीण प्रसंगात कशाप्रकारे वाट काढायची हे आपल्याला शिकवतो.
गरिबी किती वाईट, वर्णभेद म्हणजे काय,
आई वडील नसण्याच दुःख काय असतो,
आपल्या आयुष्यात शिक्षणाच महत्व किती आहे,दुर्दम्य इच्छाशक्ती असणे म्हणजे नेमकं काय ?? आत्मविश्वास कसा असावा,प्रचंड जिद्द म्हणजे काय ,मेहनत करणे म्हणजे काय, काटेकोर शिस्त कशी पाळावी,निसर्गप्रेम म्हणजे काय व निसर्गावर प्रेम कसा करावा, समाजसेवा करण्याची जिद्द कशी असावी,खरंच बाह्य सौंदर्यच महत्वाचं असतो का,आपल्या आयुष्यात आपली परिस्थिती अडथळे आणू शकते का ?? इत्यादी इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या अवलीयाच्या जीवनचरित्रातून मिळते.
वीणा मॅम यांनी प्रचंड अभ्यास,मेहनत व संशोधन करून हे पुस्तक लिहलेले असून ते कोणत्याही इंग्रजी पुस्तकाचं अनुवाद नाही किंवा हे भाषांतर केलेलं पुस्तक नाही.कार्व्हर यांच्या बाबतीत इंग्रजी भाषेत प्रचंड लिखाण केलं गेलेलं आहे.पण मराठी मध्ये नगण्य म्हणता येईल एवढंच.
अशातच वीणा ताईंनी कार्व्हर या अवलीयाच्या जीवनचरित्रावर एवढं प्रेरणादायी व अगदी साध्या-सोप्या भाषेत हे पुस्तक लिहून आपल्याला जॉर्ज कार्व्हर या ध्येयवेड्या माणसाबद्दल माहिती दिल्याबद्दल आपण वीणा ताईंचे आभार मानायला हवे.कोणतेही पुस्तक लिहायला खूप मेहनत करावी लागते.कधी कधी रात्रभर जागून टिपा काढाव्या लागत असतात. याचा आपण या पुस्तकाला अनुवादित म्हणत असताना थोडा विचार करायला हवा.तर "100 बात की एक बात " हे पुस्तक अनुवादित नसून जॉर्ज कार्व्हर यांच्या जीवनचरित्रावर लिहलेलं मूळ उत्कृष्ट मराठी जीवनचरित्र आहे.
जॉर्ज कार्व्हर यांचा जन्म गुलामगिरीच्या काळात अमेरिकेतील डायमंड, मिसुरी येथे एका कृष्णवर्णीय (निग्रो) कुटुंबात झाला.जॉर्जची आई एका शेतकरी कुटुंबात (मोझेस बाबा व सुझानबाई) गुलाम होती.जॉर्ज फक्त २ महिन्याचा असताना एकेदिवशी काही वर्णदृष्ट्यांची नजर त्याच्या आई व तिच्या एका लहान(काळ्या व कुपोषित) मुलावर पडली.मोझेस बाबांनी एका घोड्याच्या बदल्यात त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.पण वर्णदृष्ट्यांनी तिला परत न करता फक्त जॉर्ज या दमेकरी मुलालाच परत केले व तिला पळून आपल्यासोबत नेले. येथूनच तो लहान बाळ दोन महिन्याचा असतानाच पोरका झाला.जॉर्जची देखरेख आता कार्व्हर कुटुंब करू लागला व त्यांनीच त्याला कार्व्हर हे नाव सुद्धा दिले.कुपोषित व अशक्त असलेला हा मुलगा जगेल असा काही भरवसा नव्हता.पण कार्व्हर कुटुंबानी त्याला जगवले व उभारी दिली.जॉर्ज लहानपणापासूनच मेहनत व कष्ट करणारा त्याला बागकामाची खूप आवड होती,निसर्गाच्या सोबत त्याची मैत्री होती,तो नेहमी निसर्गाच्या सानिध्यात राहत असे.त्याने शिक्षणासाठी अविरत कष्ट घेतले,मेहनत केली,प्रत्येक गोष्टीतून काही न काही शिकले.समोर येईल तो काम त्याने स्वीकारले घरकाम,बागकाम,धोबी,विणकाम अथवा इतर अनेक काम त्याने केले व आपले शिक्षण पूर्ण केले....
यामध्ये त्याला खूप साऱ्या जनांनी मदत केली पण त्याने कोणाचेही फुकट उपकार कधीही घेतले नाही.कार्व्हर कुटुंबांनी त्याचे गुण ओळखून त्याला शिक्षणासाठी पाठवले आणि त्याने श्रमाने अनेक समस्यांचा सामना करत आपले शिक्षण पूर्ण केले.त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. काळा रंग त्याचा काही पिच्छा सोडत नव्हता. त्याला यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश सुद्धा नाकारला गेला.पण तरीही तो थांबला नाही किंवा घाबरला नाही.व काहीही झालं तरीही मागे हटला नाही. त्याने शिकणे व आपले काम सुरूच ठेवले.अखेर अनेक समस्यांना तोंड देत त्याला सिंप्सन कॉलेजात प्रवेश मिळाला.येथे त्याने चित्रकला आणि संगीत कलेत प्राविण्य मिळवले बाग कामेत तर तो तबरेज होताच.सिंप्सन कॉलेज नंतर त्यांनी एम्स मधील वनस्पतीशास्त्र व कृषिरसायनशास्त्र या शाखांसाठी नावाजलेल्या "आयोवा स्टेट" या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.चित्रकला व संगीतामध्ये प्राविण्य मिळवून सुद्धा त्यांनी कृषिशास्त्र निवडले.कारण कृषिशास्त्र या विषयाचा अभ्यासच त्यांच्या बांधवांसाठी उपयोगी ठरणारा होता.
1894 मध्ये त्यांनी आयोवा स्टेट कॉलेजमधून विज्ञानशाखेची पदवी मिळवली आणि याच कॉलेजमध्ये त्यांची नियुक्ती वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकापदी झाली आणि येथेच त्यांनी शिकवणे सुरू केले.दोन वर्षानंतर म्हणजेच 1896 मध्ये त्यांनी " Agricultural And Bacterial Botany" या विषयाची उच्च पदवी M.S सुद्धा संपादन केली.आणि आपले कार्य अविरतपणे सुरूच ठेवले कृषिशास्त्रात अनेक नवीन प्रयोग करून आपली ख्याती जगभर पसरवली.
ही जॉर्ज कार्व्हर आणि पुस्तकातील कथेची छोटीशी ओळख यापुढील प्रवास वाचकांनी या अप्रतिम पुस्तकातच वाचायला हवा आणि वाचून समृद्ध व्हायला हवं.
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ यांच्या सारख्या जिद्दी व समाज सेवेसाठी पेटून उठलेल्या निसर्गप्रेमी मनुष्याबद्दल वाचत असताना आपण किती वेळा रडतो ,अंतमूर्ख होऊन जातो तर किती वेळा विचारात गुंतत जातो. याचा आपल्याला थोडं सुद्धा भान राहत नाही.जॉर्ज कार्व्हर यांच्याबद्दल जेवढं लिहावे तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल विस्तृत जाणून घ्यायचं असेल तर हे अफलातून व जबरदस्त पुस्तक प्रत्येकांनी वाचायला हवेच.
शेवटी लेखिकेच्या भाषेत सांगायचं असल्यास :-
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे, एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणा-या आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर हताशपणे वाटचालकरायची किंवा परत मागे फिरून काव्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कॄषिसंस्कॄतीचा स्वीकार करायचा. भावी पिढ्यांच्या
-समॄद्धीचा पाया घालायचा असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक..
©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा