एक अनभिषिक्त सम्राट खंडोबा ♥️
रविवारी या एका अफाट आणि भन्नाट कादंबरीचा म्हणा किंवा महागाथेचा म्हणा एक रोमांचक व अफलातून प्रवास संपला.आणि मी चक्क भूतकाळात खंडोबाच्या काळात जाऊन आल्याचा फील मला आला.कादंबरी वाचून 3 दिवस उलटले असले तरीही मी कादंबरीच्या त्या वातावरणात, त्या काळातच वावरतोय.असा भास मला होतोय.जणू कादंबरीतील सर्वकाही मी प्रत्यक्ष डोळ्याने बघून आणि अनुभवून आलोय असं मला वाटतंय.कोठेही बोअर न करता सलग शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या या कादंबरीच्या कथानकात एक नशा आहे.या कादंबरीची एक मोहिनी म्हणा किंवा नशा काही काळ तरी उतरत नाही आणि उतरणार नाही हे मात्र खरंय.वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या जीवन आणि कार्यावर आजपर्यंत असंख्य पुस्तके/ कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत.पण खंडोबा या कादंबरीमध्ये वापरलेली संकल्पना/कन्सेप्ट ही फार वेगळी वाटते.वर्तमानकाळाचा पडदा फाडून भूतकाळात जाणे आणि त्या काळातील त्या व्यक्तिमत्वाच्या सानिध्यात राहून त्याचं एकूण जीवनप्रवास आपल्या सारख्या सामान्य मानवाच्या नजरेतून अनुभवणे हे फारच भारी.
वाचायला सुरुवात केल्या केल्या आपण यामध्ये एकंदरीत गुंतून जातो आणि पुढे सलग गुंततच जातो.मग आपल्याला आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे ? याचं भान सुद्धा राहत नाही.आपण या कादंबरीचा आणि यातील प्रवासाचा एक भाग होऊन जातो.यातील पात्रांच्या सोबत आपण मिसळून जातो.आपण त्यांच्याशी कधी संवाद साधायला लागतो हे आपल्याला कळतं सुद्धा नाही.आपण त्याकाळात जाऊन पोहोचतो.त्या काळातील घटना, पात्रे, ठिकाणे, प्रसंग आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः उभे राहतात.चोहीकडे आपल्याला फक्त प्राचीन काळातील तो महाराष्ट्र दिसायला लागतो.
बारीक सारीक छोट्या मोठ्या गोष्टीचं लेखकांनी केलेलं सुंदर आणि साजेसं वर्णन हा मनाला भावून जातो.उगाच फक्त पृष्ठसंख्या वाढवायची म्हणून वेगवेगळे 'अलंकारिक' शब्द वापरून एखाद्या प्रसंगाचं विस्तृत वर्णन करणे लेखकांनी टाळलं आहे.सोप्या आणि एकदम साध्या भाषेत एखाद्या ग्रामीण भागातील जेमतेम वाचता येणाऱ्या वाचकाला सुद्धा समजेल अश्या साध्या आणि सुंदर भाषेत ही कादंबरी लिहिली गेली आहे हे विशेष.या कादंबरीची खासियत म्हणजे यामध्ये वापरलेली लेखनशैली ही होय.ज्या पद्धतीने लेखकांनी या कादंबरीचे लिखाण केले आहे ते खरंच अफलातून आहे.जे वाचत असतांना असंख्य वेळा अंतर्मुख व्हायला होतं. कितीतरी प्रसंग वाचत असताना आपले डोळे पाणावतात आणि हाच या कादंबरीचा यश आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबावर ही कादंबरी आधारित आहे.खंडोबा म्हणजे नेमकं कोण ?ते देव होते अथवा अवतारी पुरुष होते की एक पराक्रमी योद्धा होते ? दैवी अवतार म्हटल्यावर आपल्याला विशेष काही प्रश्न विचारण्याची किंवा शंका उपस्थित करायची गरजचं भासत नाही.कारण दैव म्हटलं की चमत्कार आलं आणि चमत्कार आलं म्हटल्यावर वास्तवासोबत त्याचा फारसा काही संबंध उरतं नाही.पण जेव्हा विषय एका पराक्रमी पुरुषाचा त्याच्या इतिहासाचा येतो.तेव्हा असंख्य प्रश्न आपल्या मानवी मनात येतात आणि मग सुरू होतो प्रवास त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा.आणि एकंदरीत या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत असतानाच या कादंबरीचा जन्म झाला असे आपण म्हणू शकतो.खंडोबासारख्या एका महापराक्रमी पुरुषाला अवताराच्या कूपीतून बाहेर काढून वाचकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या कादंबरीत सुंदररित्या लेखकांनी केला आहे.एका हाडामासाच्या मानवीरुपात आपल्याला या कादंबरीत खंडोबा बघायला,अनुभवायला मिळतो.ज्यामध्ये मग कुठल्याही चमत्काराला स्थान नाही.स्थान असतो तो फक्त त्याच्या अफाट कर्तुत्वाला त्याच्या शौर्याला आणि माणुसकीला.
खंडोबा जर गडावर राहणारा आपल्यासारखा सामान्य व्यक्ती असेल तर आता ऐकिवात असलेल्या गोष्टी,घटना तेव्हा कशा घडल्या असतील ? सामान्य माणसाच्या डोळ्यांनी पाहताना अवतार समजल्या जाणाऱ्या खंडोबाचा अवघा जीवनप्रवास झर झर डोळ्यासमोर सरकू लागला.आयुष्य जगताना सामान्य माणसाप्रमाणे खंडोबालाही संघर्ष करावाच लागला असणार.सुख - दुःख , नातेसंबंध , जाणिवा,यातना या साऱ्यातून खंडोबाही गेलाय.विशेष म्हणजे या सोबतच खंडोबाला रणांगणावर उतरून आसुरी प्रवृत्तीशी युद्धही करावी लागलीत.थोडेफार कलह,संघर्षांनी डगमगून जाणारा आजचा माणूस पाहिला तर त्यावेळी अठरापगड जनतेला आपलंस करीत युद्ध आणि संहाराला तोंड देत जेजुरी नगराला अबाधित ठेवण्याचं अग्निदिव्य त्याने कसं पेललं असेल,असा विचार लेखकांच्या मनात आला आणि याचं विचाराने प्रभावित होतं त्यांनी अवतारी खंडोबाला पराक्रमी योद्धा बनवण्याचं आव्हान अप्रतिम पध्दतीने पेललं आहे.
वास्तव आणि तर्कांपासून थोडं सुद्धा विचलित न होता योग्य त्या तार्किक पध्दतीने व आपल्या कल्पनेचा योग्यरित्या वापर करून ही कादंबरी लिहिली गेली आहे.जी खरंच खूप वाचनीय झाली आहे.
यामध्ये -
खंडोबा कोण होता ?
खंडोबाचा कुळ आणि साम्राज्य कोणता होता?
खंडोबा हा नाव नेमकं कसं पडलं असेल ?
खंडोबानी ज्या मनी आणि मल्ल? चा संहार केला होता ?ते नेमके कोण होते ?
खंडोबाचा बालपण कसा आणि कोठे गेला ?
खंडोबाचे मित्र कोण होते ?
प्रत्येक गावामध्ये खंडोबाची प्राचीन मंदीरे का आहेत?
खंडोबानी दोन लग्न का केले खंडोबाने?
खंडोबाला मल्हारी का म्हणतात ?
इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळत जातात.आता काही जणांच्या मते कादंबरी जरी ऐतिहासिक प्रमाण नसतो किंवा कादंबरी ही काल्पनिक असते.हे योग्य आणि मान्य असलं तरीही काहीही अतार्किक व चमत्कारीक दैवी कथांवर विश्वास ठेवण्यापेक्षा या असल्या मानवी,शौर्यकथेवर विश्वास ठेवून यातून खंडोबा सारख्या आदर्श पुरुषाचे 2 चांगले गुण जरी घेता आले,त्यांच्यासारखं आदर्श राजा,पुत्र,मित्र,पती,भाऊ आणि माणुस बनता आलं तरी ते खूप होईल.शेवटी लेखक म्हणतात तेच खरं की खंडोबाला देव्हाऱ्यात अवश्य पूजा पण त्याच सामर्थ्यशाली जगणं मनाच्या गाभाऱ्यात सदैव तेवत ठेवा ! इतकचं... 🙂
यातील आवडलेले काही वाक्य....💙
●आपल्या मनात प्रत्येका विषयी वेगळ्या भावना असतात. प्रत्येक व्यक्तीनुरूप आपण प्रेम करत असतो.
●अश्रुंमुळेच तर माणुसकीला न्याय मिळतो.
●प्रत्येकवेळी बदला हेच उत्तर नसत. कधी कधी समंजसपणाही महत्वाचा ठरतो.
●युद्ध असो वा आयुष्य अगोदर हिमतीवर विजय मिळवावा लागतो, त्यानंतर परिस्थितीवर.
●अन्याय करणारा आपल्या रक्ताच्या नात्यातला असो वा आपल्या भावनांच्या नात्यातला त्याला शिक्षा देणे यालाच पुण्यधर्म म्हणतात.
आणि महत्वाचं आणि वास्तववादी वाक्य म्हणजे ...
●देव आणि दानवापेक्षा माणूस नीच होता हे अंतिम सत्य राहील.
(काहीही चुकलं वगैरे असेल तर मोठ्या मनाने माफ करा.)
©Moin Humanist✍️
मी वाचलेली पुस्तके 💙
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा