येस, आय ॲम् गिल्टी !
काही दिवसांपूर्वी मुनव्वर शाह लिखित हे 1983 साली प्रकाशित झालेलं पुस्तक वाचण्यात आलं.गेली ३ दिवस मुनव्वरने या पुस्तकात मांडलेल्या विचाराबद्दल मी विचार करत होतो.कारण त्याने मांडलेले विचार कोणत्याही सद्विवेक बुद्धी असलेल्या वाचकाला नाकारता येणारे नाहीत.हे पुस्तक वाचतं असताना एक वेगळीच भावना मनात होती.आयुष्यात प्रथमच एखाद्या गुन्हेगाराचा आत्मकथन किंवा आत्मविवेचन वाचत होतो.जे वाचत असताना मी पूर्णपणे यामध्ये हरवून गेलो होतो.यातील वर्णन वाचून जणू ते माझ्यासमोर घडत असल्याचा भास अनेक वेळा मला झाला.आणि शेवटी
"वाईट संगतीचा परिणाम नेहमी वाईटच होतो" यातून हा एक मोलाचा धडा मला शिकायला मिळाला.आणि हकनाक बळी घेतलेल्या त्या निष्पाप जीवांसाठी सहानुभूती पुन्हा वाढली..
1970 च्या दशकात,1976 साली पुण्यात
“जोशी-अभ्यंकर खून खटला"प्रचंड गाजला होता.या खटल्याने सगळ्यांचीच एकंदरीत झोप उडवली होती.आणि आज सुद्धा या प्रकरणाबाबत वाचत,ऐकत असताना अंगाचा थरकाप उडतो.राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप, मुनव्वर शाह आणि सुहास चांडक यांनी हे निर्घृण 10 हत्याकांड घडवून आणले होते, यातील सुहास चांडक हा पुढे माफीचा साक्षीदार झाला होता..तर बाकी चौघांना 25 ऑक्टोबर 1983 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.यातील मुनव्वर शहाने कैदेत असताना "यस आय एम गिल्टी" नावाचे हे आत्मचरित्र लिहिले आहे.या पुस्तकात त्याने त्याचं एकंदरीत जीवनचरित्र लिहिलं आहे.जन्मापासून,पदवीधर होण्यापर्यंत तर या कृत्यामध्ये समाविष्ट होण्यापर्यंतचे सर्व वर्णन त्याने यामध्ये केले आहे.जे वाचत असताना एक वेगळीच भावना मनात संचारते. 20 ते 25 वयोगटातील हे सुशिक्षित युवक फक्त थ्रील,डेंरिंग साठी हा भयानक आणि क्रूर मार्ग पत्करतात आणि फासावर जातात.हे तर मरतातच पण इतर निष्पाप लोकांचा हकनाक यामध्ये बळी जातो.
प्रकाशकाच्या मते :-
एक सामाजिक जबाबदारी म्हणून मुनव्वरने हे आत्मकथन लिहिले आहे. हे लिहिताना त्याने मनमोकळेपणाने सर्व हकीकती सांगितल्या आहेत . परंतु योग्य ते पथ्य प्रकाशकांनी पाळले आहे . या संदर्भात एक घटना मुद्दाम नमूद करावीशी वाटते . अभ्यंकरांच्या बंगल्यात शिरल्यापासून जे काही घडले त्याचे अगदी रेखीव वर्णन त्याने दिले आहे .पण इतर लोक गैरवापर करतील म्हणून फासाची गाठ कशी व कोणती होती इत्यादी तपशील त्याने पुस्तकात दिलेला नाही..
आपल्या या पुस्तक लिहण्याच्या उद्देशाबद्दल मुनव्वर एका पत्रात लिहितो :-
" कठोरतम वर्तमानात राहून अंधकारमय भविष्य दृग्गोचर होत असताना भूतकाळाबद्दल लिहिणे सुलभ नाही . ह्यात यातना आहेत . भयंकर यातना आहेत . जे ह्याचा विरोध करतात त्यांना केवळ माझे इतकेच सांगणे आहे की मी त्यांच्यापुढे सत्य मांडले आहे . त्याचा हवा तसा उपयोग करा , माझ्याविरुद्धही त्याचा वापर करा . मला नष्ट करण्याकरताही हवे असल्यास त्याचा वापर करा . परंतु कृपया त्याच्याबद्दल अविश्वासाची , संशयाची भावना बाळगू नका वा निर्माण करू नका . माझी विश्वासार्हता मी गमावून बसलो आहे . मला त्याची जाणीव आहे . मी माझी सत्यता कोणासही सिद्ध करून दाखवू शकत नाही . मी अतिशय असाहाय्य आहे . ह्या असाहाय्यतेचा गैरफायदा कृपया घेऊ नका आणि ह्याच्या हेतूबद्दल शंका बाळगून , मत कलुषित करून त्याची उपयोगिता नष्ट करू नका..
बाकी हे पुस्तक प्रकाशित होताच खूप गदारोळ माजला होता.या पुस्तकावर बंदी घालण्याची सुद्धा मागणी केली गेली होती. पण ते काही झालं नाही.एका वाचक आणि सुजाण नागरिकाच्या दृष्टीकोनातून हे पुस्तक मनात कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचण्यासारखं आहे.यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे.आजच्या काळात तर अजूनही हे पुस्तक जास्त वाचलं गेलं पाहिजे.
बाकी मुनव्वरने आपला गुन्हा कबूल केला होता त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळाली आहे.वरी त्यानेच म्हटलं आहे की "माझी विश्वासार्हता मी गमावून बसलो आहे . मला त्याची जाणीव आहे . मी माझी सत्यता कोणासही सिद्ध करून दाखवू शकत नाही.त्यामुळे
हे पुस्तक वाचत असताना मला त्याच्याबद्दल व इतर कोणाबद्दलही कुठलीही सहानुभूती वाटली नाही हे मला विशेष वाटतं.
आणि हाच मी या पुस्तकाचा यश समजतो..
नक्की वाचा.
युवकांनी तर आवर्जून वाचायला हवं.
यातून खूप काही बोध घेण्यासारखं आहे..
तूर्तास एवढंच....
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा