एम टी आयवा मारू ❤️
मी वाचलेली मला प्रचंड आवडलेली एक अप्रतिम कादंबरी. जी वाचत असताना मी पूर्णपणे त्यामध्ये हरवून गेलो होतो.सहज वाचता वाचता कधी वाचून पूर्ण झाली हे मला स्वतःसुद्धा कळालं नाही..एकंदरीत तुम्ही जर एखाद्या हटके,भन्नाट, रोमांचक आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या मराठी कादंबरीच्या शोधात असाल तर ही कादंबरी नक्की वाचावी.एक वेगळाच नशा आणि हँगओव्हर ही कादंबरी वाचताना वाचकांवर चढतो जो कितीतरी दिवस उतरत नाही.पहिल्या पेज पासून शेवटच्या पेजपर्यत वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहे.एकदा वाचन सुरू केल्यावर वाचून पूर्ण केल्याशिवाय ठेऊच शकत नाही असा या कादंबरीचा कथानक आहे.अनंत सरांची लेखन शैली म्हणजे अफलातून आणि बिंदास्त अशी आहे.लेखकांची ही पहिलीच कादंबरी आहे असं वाचताना कोठेही वाटतं नाही.1989 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीची मोहिनी वाचकांना भुरळ पाडते.385 पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी वाचताना वाचकाला कोठेही थोडं सुद्धा कंटाळा येऊ देत नाही.लेखक स्वतः नाविक असल्याने लेखनातील जहाजावरील तांत्रिक बाजू त्यांनी योग्य पध्दतीने सांभाळली आहे.
समुद्र,जहाज आणि जहाजावरील एका वेगळ्याच विश्वाची सफर ही कादंबरी घडवून आणते.घरी बसल्या बसल्या एका रंजक समुद्र सफरीवर जाऊन आल्याचा भास आपल्याला होतो.वाचत असताना जणू आपणच त्या जहाजावर वावरतोय,जगतोय असं आपल्याला वाटायला सुरुवात होते.यातील प्रत्येक पात्राशी आपण परिचित होत जातो.स्वतःला रिलेट करतो.कधी आपण कॅप्टन होतो तर कधी सेनगुप्ता तर कधी सेकंड.जहाजावरील या माणसांच्या सुखा/दुःखात सहभागी होऊन जातो.एकदंरीत नकळतपणे या कादंबरींचा आपण कधी एक हिस्सा किंवा भाग होऊन जातो हे आपल्याला कळतं सुद्धा नाही.सेकंड ऑफीसर अनंत सामंत, सेकंड इंजिनीयर दीपक उपाध्याय, चीफ ऑफीसर पॅट्रीक अॅडॅम्स, थर्ड ऑफीसर डालिझे, रेडीओ ऑफीसर चांद, कॅडेट सेनगुप्ता,वृद्ध अनुभवी खलाशी बोसन, अत्यंत अनुभवी तडफदार कॅप्टन रॉस, अनंतची प्रेयसी अॅना आणि मिसेस उज्ज्वला ही पात्रे आपला पिच्छा कादंबरी वाचून संपल्यावर सुद्धा सोडत नाही.वाचायला सुरुवात केल्यानंतर काही वेळातच हे कथानक आपल्या डोळ्यासमोर घडतोय असं आपल्याला वाटायला लागते.एवढी जादू लेखकांच्या लिखाणात आहे.
एम टी-मोटर टॅंकर म्हणजे यंत्रचलित द्रववाहक. `मारू’ म्हणजे जहाज. `आयवा मारू’ या जपानी शब्दांचा अर्थ – प्रेम आणि एकरूपता यांच्या भावुक चेतनेचे जहाज.अश्या या एम टी आयवा मारू या जहाजाची,समुद्राची,समुद्रातील वादळाची,जहाजावरील माणसांची आणि या माणसाच्या मनातील भावनिक वादळाची ही रंजक कथा आहे.प्रेम-द्वेष या भावभावनांचा जिवंत झंझावात आहे.या रंजक कहाणीची सुरू होते 1 डिसेंबर 1975 साली हॉंगकॉंगच्या किनाऱ्यापासून.मोटर टँकर ओरायन पंचेचाळीस हजार टन तेल पोटात साठवू शकणारं एक जहाज. 1940 च्या सुमारास बांधलेलं. त्याचा मालक जपानी उद्योगपती. एम्. टी. ओरायन हे त्याने घेतलेलं पहिलं जहाज. या जहाजानंतर त्याने बावन्न जहाजं घेतली. म्हणून हे पहिलं सुलक्षणी ठरलं. त्यामुळे मोडकळीला आल्यानंतरही वाटेल ती किंमत देऊन तो ते जहाज चालवत होता. शेवटी त्यालाही ते जहाज चालवणं अशक्य झालं तेव्हा लक्षावधी येन्सचा मोबदला घेऊन कार्ड्स शिपिंग कंपनीने ते जहाज चालवायला घेतलं. त्याची जुनाट इंजिन्स ओकत असलेल्या काळ्याकुट्ट धुरामुळे आणि समुद्र अशुद्ध करणाऱ्या गळक्या पाइपलाइन्समुळे जगातल्या निम्म्या देशांनी ते जहाज तडीपार केलं होतं, दोन वर्षांपूर्वी स्क्रॅप करण्यासाठी तेच जहाज कंपनीने मालकाकडे परत सुपूर्द केलं होतं.
आता 2 वर्षानंतर याचं मोडकळीस आलेल्या जहाजाला "एम टी आयवा मारू"हा नवीन नाव देऊन कार्ड्स कंपनी काही अधिकाऱ्यांना व खलाश्यांना खोटी स्वप्न दाखवत या एका वेगळ्याच समुद्र सफरीवर पाठवते.या जहाजी सफरीत यांना आलेले अनुभव.समस्या तर घडत जाणाऱ्या विचित्र घटना आणि बदलत जाणारे सर्वांच्या स्वभावाचे रोचक वर्णन आपल्याला वाचायला मिळतात.जे वाचत असताना आपण त्यामध्ये हरवून गेल्याशिवाय राहत नाही.
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा