अरण्याचे अतरंग ❤️



गौतम बुद्ध आणि त्यानंतर हेन्री डेव्हिड थोरो उर्फ थोरो गुरुजी यांच्याबद्दल आणि यांनी लिहलेलं साहित्य वॉल्डन,केपकॉड वाचल्यापासून निसर्ग,प्राणी,पक्षी आणि पर्यावरणाची खूप आवड निर्माण झाली आहे.निसर्ग आणि प्राण्यांच्या सानिध्यात जीवन जगावं असं आता नेहमी वाटतं असतं.पर्यावरणाच्या संवर्धनासाठी चांगलं कार्य करावं,वेगवेगळी झाडे लावावी आणि ती जगवावी,प्राण्यांच्या सानिध्यात जावं त्यांच निरीक्षण करावं असं आता प्रामुख्याने वाटायला लागलं आहे.आणि लवकरच सुरुवात करणार आहेच.लहानपणी जंगलबुक बघितल्यापासूनच ही इच्छा कायम मनात होती आणि आता ती कितीतरी पटीने वाढलेली  चाललेली आहे.

निसर्ग,प्राणी व पक्ष्यांची आवड लागली म्हटल्यावर या संबंधित वाचन सुद्धा आलंच.यामुळे मी आता निसर्ग साहित्याकडे मोर्चा वळवला आहे.एकंदरीत हा जेनर माझा आवडता बनत चालला आहे.चकवा चांदण,डॉ.सलीम अली,भारतीय पक्षी, वॉल्डन,निसर्गमित्र जॉन म्युर,बनकीस्सा,शेकरा,नदिष्ट,माचीवरला बुधा,सत्तांतर इत्यादी या विषया संबंधित काही पुस्तके मी वाचली असून अजून कितीतरी पटीने पुन्हा खूप काही वाचायचं बाकी आहे.मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर इत्यादी लेखक माझ्या वाचन यादीत टॉपवर असून लवकरच यांच समग्र साहित्य व इतर काही यासंबंधीत दर्जेदार पुस्तके मला वाचून काढायची आहेत.त्यामुळे मी सतत या जेनरच्या पुस्तकाच्या शोधात असतो आणि योग्य त्या वेळेवर मला एखादं तरी पुस्तकं सापडतंच.

तर अशातच काही दिवसांपूर्वी माझ्या नजरेत अतुल धामणकर सर लिखित 'अरण्याचे अतरंग' हे भन्नाट आणि गोड पुस्तक आलं. मी हे मागवलं आणि लगेच वाचून काढलं.आणि वरील वाचन यादीत अजून एक सुंदर भर पडली.2 बैठकीत मी हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन प्राणी,पक्षी निरीक्षण करून आल्याचा मला भास झाला.एवढ्या छान आणि सोप्या शब्दांत लेखकांनी आपल्या अरण्य भटकंतीचे अनुभव वाचकांना सांगितले आहे की आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहूच शकत नाही.दाट जंगलातल्या पाणझरीकाठी मचाणीवर तासनतास बसून पाण्यावर येणारे वाघ, बिबळे, अस्वलांचे निरीक्षण करताना केवढे रोमांचक अनुभव वाट्याला येतात आणि हे अनुभवणे किती सुखद असते हेच लेखकांनी या पुस्तकात सांगितले आहे.जेरडॉनच्या धाविकासारख्या दुर्मीळ पक्षाच्या शोधासाठी गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम जंगलातली शोधयात्रा असो , की खोकडासारख्या प्राण्याचे तासन्तास केलेले निरीक्षण , हे सगळे क्षण आपल्याला अरण्यात घेऊन जातात . अतुल सर मागील दीड तपापासून रानावनात भटकून वन्यजीव व पक्ष्यांचा अभ्यास करीत आहेत. याच दरम्यान त्यांनी घेतलेले काही अतिशय थरारक अनुभव सोप्या भाषेत व ओघवत्या शैलीत या पुस्तकात प्रस्तुत केले आहेत . वाघ , वन्यजीव , पक्षी , मगर यांच्यासोबतच अरण्यातील अनेक घटकांपाठी पायी फिरून केलेल्या निरीक्षणातला रोमांचकपणा व थरार आपल्याला अरण्यातील अंतरंगात घेऊन जातात.

हे पुस्तक वाचत असताना जणू आपणच जंगलात जाऊन मचाणीवर बसून हे अनुभव घेतोय असं वाटायला सुरुवात होते.वाचता वाचता आपण या पुस्तकात एवढं हरवून जातो.की आपल्याला आजूबाजूचे सुद्धा भान राहत नाही.पुस्तकाची सोपी भाषा आणि प्रत्येक प्रकरणात दिलेले प्राणी,पक्ष्यांचे रेखाटलेले चित्र हे तर कमालीचे सुंदर झाले आहेत.लेखकांनी ज्यापद्धतीने त्यांनी केलेलं निरीक्षण या पुस्तकांत मांडलेलं आहे त्याला खरंच तोड नाही.वाघ,मगर,हरीण,माकडं,रानकुत्रे, वटवाघूळ,पोपट,कॅमेलीयन,मोर,खोकड,अस्वल,गरुड,ससे इत्यादी असंख्य प्राणी, पक्षीचे रंजक आणि मनमोहक अनुभव आपल्याला वाचायला मिळतात.

आपल्या मनोगतात या निरीक्षणाबद्दल लेखक म्हणतात :-

नैसर्गिक अवस्थेत वन्यजिवांचं निरीक्षण करणं हे अतिशय कठीण आणि भारी संयमाचं काम मात्र , मी मागील अनेक वर्षांपासून रानावनात अविरत भटकंती करून , तासन्तास घनदाट जंगलात एखाद्या पाणझरीकाठी असलेल्या मचाणीवर बसून वन्यजीव पक्ष्यांचं निरीक्षण केलं आहे. असं निरीक्षण करणं ही एक तपश्चर्याच असते. तासन्तास , दिवसेंदिवस मचाणीवर बसणं हा वरून जरी मजेचा भाग वाटत असला , तरी ही तितकीशी सोपी गोष्ट नाही . उन्हाळ्यात प्रचंड उष्म्यानं जीव घाबरा होतो , घसा वारंवार सुकून कोरडा पडतो , पाण्याच्या लालसेनं चेहऱ्याभोवती उडणारी केमरं नाका डोळ्यांत शिरायला बघतात . कुठलीही हालचाल होऊ नये , याकरता त्यांना हातानं हाकलता देखील येत नाही. त्यातच जर त्या पाण्यावर बराच काळ कोणताच वन्यप्राणी आला नाही तर तिथं बसणं एक शिक्षा वाटू शकते.पण अशाच वेळी मी जास्त तल्लख बनतो.मला इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर चांगलं माहीत झालंय की , अशा त्रासदायक काळानंतरच एखादा वन्यप्राणी शांतपणे पाण्यावर येतो . अगदी जंगलाचा राजासुद्धा . ऊन , थंडी , पाऊस अशा अनेक त्रासदायक बाबींना तोंड देत मी आजवर वन्यजीव निरीक्षण व पक्षिनिरीक्षण केलंय . पक्ष्यांचं केवळ निरीक्षण करायचं असलं तर ते तुलनेनं सोपं आहे . पण आधी त्यांचं घरटं शोधून त्यांच्या वीण वागणुकीचा अभ्यास करणं एक कठीण काम आहे . असं करण्याकरता प्रचंड परिश्रम घेण्याची तयारी ठेवली , तरच हे करता येणं शक्य आहे . मी विदर्भातल्या रणरणत्या उन्हात , भर दुपारी माझ्या लहान कापडी लपणात बसून या पाखरांच्या वीण वागणुकीचा अभ्यास केला आहे.लपणात बसल्यावर घामाच्या धारांनी शरीरातलं पाणी वेगानं कमी होतं. क्षार कमी झाल्यानं हात -पाय आखडण्याची भीती असते . जवळ असलेल्या बाटलीतलं कोमट पाणी कितीही प्यायलं , तरी तहान जात नाही .पण हे सगळं सोसल्यावर पक्षिअभ्यासाचा जो खजिना हाती लागतो , त्याचं वर्णन करणं शब्दांपलीकडचं आहे..❤️

१ ) वटवाघळांचं झाड २ ) जलाशयातील पारधी ३ ) काळ्या पाण्याच्या नाल्यात ४) मृत्यूचं जाळं . ५) रंग बदलणारा कॅमेलियन .६) अद्भुत मलबार धनेश.७) नाच रे मोरा. ८ ) रानातला पोपट. ९ ) माळरानाचे वारकरी .
 १०)जेरडॉनच्या धाविकाच्या शोधात . ११)खोकडाची पिल्लं.या अकरा प्रकरणात विभागलेलं हे १०४ पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक खूपच वाचनीय आहे.

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼