देवदासी आणि नग्नपूजा
उत्तम कांबळे लिखित हे 120 पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक काल रात्री वाचून समाप्त केलं.. एकंदरीत खूप कठीण गेलं हे पुस्तक वाचायला.कारण वाचताना अनेक वेळा एकंदरीत सुन्न व्हायला होतं.देवदासी प्रथेचा इतिहास, देवदासी प्रथेचे स्वरूप,पद्धत आणि लेखकाचे नग्न पूजेचे प्रत्यक्ष बघितलेल्या अनुभवाचे वर्णन वाचून कमालीचं अस्वस्थ व्हायला होतं.
वाचताना विचारांच्या चक्रात गुंतून डोकं हँग होतं.वाचत असताना कितीतरी वेळा किळस येते तर अनेक वेळा आपसूकच डोळे पाणावतात. देव, धर्माच्या नावाखाली हे असले कृत्य लोकं खपवतातच कसे ?हा प्रश्न मनाला भेडसावतो.अंधश्रद्धेच्या आहारी लोकं किती खालच्या पातळीवर जातात ते हे पुस्तक वाचून लक्षात येतं.या पुस्तकाची पहिली आवृत्ती जरी 1988 साली आली असली तरीही तेव्हा आणि आता सुद्धा या प्रथेत पडायला हवा तेवढा काही फरक पडलेला हे पुस्तक वाचत असताना जाणवत नाही.या प्रथेविरुद्ध किती आणि कसं कार्य झालं ?कितीप्रमाणात जनजागृती झाली ? कोणकोणते कायदे या विरोधात तयार झाले ?इत्यादी प्रश्नांची उत्तरे बरीच प्रमाणात निराशाजनक आहे.जातीयवाद ज्याप्रकारे पूर्णपणे संपला असे आपण म्हणू शकत नाही ठीक त्याचप्रमाणे देवदासी प्रथा सुद्धा संपूर्ण संपली असं आपण म्हणू शकत नाही.उघडपणे देवदासी सोडणं आता जवळपास बंद झालं असलं तरीही लपूनछपून हे कृत्य होतं नसेल याबद्दल शंका आहे.कारण हा अंधश्रद्धेचा भयंकर आजार एवढ्या लवकर पाठ सोडणारा नाही.त्यामुळे या विषयांवर आपण नेहमी बोलत,लिहीत आणि वाचतं राहायला हवं.या विषयांवर आज सुद्धा जनजागृती करण्याची गरज आहे.🙏
लेखक म्हणतात :-
१९३४ साली संमत झालेल्या ' बॉम्बे देवदासी प्रतिबंधक कायद्यानुसार कोणताही हिंदू देव , मूर्ती , धर्मस्थळ , संस्था मंदिर यांना मुली वाहण्यास बंदी करण्यात आली . मुली वाहणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला . या कायद्याचे उल्लंघन केल्यास एक वर्ष सक्तमजुरी अथवा दंड किंवा दोन्हीही शिक्षा देण्याची तरतूद आहे . पण या कायद्याचा प्रचारही म्हणावा तितका झाला नाही . तो होणे गरजेचे आहे . या शिवाय आणखी काही मार्गाने देवदासी प्रथेला हादरा देता येईल.
उदा :-
1) देवदासीमुक्त गावाला शासनाने पारितोषिक द्यावीत .
2)गावात देवदासी विधी होऊ नये . यासाठी गावातील पोलीस पाटील , सरपंच यांना काही अधिकार शासनाने द्यावेत .
3) देवदासीचा ज्याच्याशी झुलवा लागतो त्यांच्या संपत्तीमधील वाटा देवदासीला मिळावा .. तिच्यानंतर तिच्या मुलांना तो मिळावा .
4)ज्याच्यापासून देवदासीला मुले होतात . त्यांचे नाव या मुलांना बाप म्हणून देण्याची कायद्याने सक्ती व्हावी . 5)देवदासीशी विवाह करून घेणाऱ्यास आर्थिक अनुदानाबरोबरच नोकऱ्यांत प्राधान्य द्यावे अथवा उद्योगधंदा उभारण्यास त्याला अर्थसाहाय्य करावे .
6) ज्या मंदिरात देवदासी विधी होतो , अशी सर्व मंदिरे शासनाने ताब्यात घ्यावीत .
7) प्रत्येक सरकारी दवाखान्यात मुला - मुलींच्या जटा कापण्याची मोफत सोय व्हावी .
8)देवदासी प्रथेसंबंधी माहितीपट तयार करून तो खेड्यापाड्यांत दाखवावा .
9) प्रत्येक परिवर्तनवादी संघटनेने देवदासी प्रथा बंद करण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे .
10)देवदासी प्रथेविरुद्ध सातत्याने चळवळ करणाऱ्या संघटनांना शासनाने अर्थसाहाय्य व साधनसामग्रीच्या रूपाने बळ द्यावे .
इत्यादी असंख्य मार्गाने ही प्रथा कायमस्वरूपी संपवण्यासाठी प्रयत्न करता येतील.हा प्रश्न कोणा एका संघटनेचा नाही तर तो संपूर्ण समाजाचा आहे.आपल्याला आपला सुद्धा दृष्टीकोन बदलावा लागेल.हा अंधश्रद्धेचा चक्र दिसतो तेवढा सोप्पा मुळीच नाही.याची पाय समाजमनावर खूप खोलवर रुतलेले जाणवतात.
हे पुस्तक म्हणजे रूढ अर्थानी संशोधनग्रंथ नाही.देवदासी चळवळीत काम करत असताना जे जे अनुभवायला शिकायला , अभ्यासायला मिळालं त्यातून ह्या पुस्तकाचा जन्म झाला . चळवळीतल्या कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन हे पुस्तक लिहिलं गेलं आहे .या पुस्तकातील भाषा , मांडणी , सादरीकरण सर्वंकाही सोपं आहे . विषय बोजड होणार नाही , क्लिष्ट होणार नाही , अनाकलनीय होणार नाही याची काळजी प्रत्येक पानात लेखकांनी घेतली आहे . एका कार्यकर्त्यांनं दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी आणि एकूणच प्रबोधनासाठी लिहिलेलं हे छोटसं माहितीपूर्ण पुस्तक आहे.ही क्रूर प्रथा संपावी यासाठी ठोस भूमिका घेऊन लिहिलेलं हे पुस्तक आहे .लेखकांनी निष्पक्ष राहण्याचा प्रयत्न थोडासुद्धा केलेला नाही.हे पुस्तक वाचताना आपल्याला जाणवते.
लेखकांना हे पुस्तक लिखाणासाठी माहिती जमा करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले,या अडचणी एवढ्या गंभीर होत्या की त्यामध्ये त्यांच्या जिवावर सुद्धा बेतले होते.याची प्रचिती आपल्याला त्यांनी या पुस्तकात शेवटी केलेले चंद्रगुत्तीतील वर्णन वाचूनच येते.
देवदासी प्रथा म्हणजे नेमकं काय ?या प्रथेचा इतिहास आणि स्वरूप काय व कसा होता ?ही प्रथा कशी आणि कोठे चालते ?या प्रथेमागे नेमकी कारणे काय ?या विरुद्ध झालेले आतापर्यंत कायदे कोणते ? इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हे छोटसं पुस्तक नक्की वाचा आणि यावर विचार करावा...🙏
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा