शेकरा ❤️

काही पुस्तके खरंच न्यारी असतात.वाचायचं कुठलाही अंदाज नसताना आपण ती फक्त चाळायला घेतो.पण चाळता चाळता ते पुस्तक कधी वाचून संपवतो हे आपल्यासुद्धा कळत नाही.माझ्याबाबतीत हे असंच बऱ्याच वेळा झालं आहे.तर रात्री पुन्हा असंच काही घडलं.एका सरांनी मला हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं.आणि इतर वाचन बाजूला ठेऊन मी रात्री एका बैठकीतच हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.विविध विषयावर असंख्य कादंबऱ्या लिहिणाऱ्या रणजित देसाई सरांनी या विषयावर सुद्धा छोटीशी पण अंतमूर्ख करणारी कादंबरी लिहिली असेल याचा मी पूर्वी विचारच केला नव्हता.हे पुस्तक वाचून मला एक सुखद धक्का बसला.

ते पुस्तक म्हणजे रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती आणि एक विलक्षण लघु कादंबरी असलेली शेकरा ही होय.एकूण फक्त 76 पृष्ठसंख्या असलेली ही लघु कादंबरी प्रत्येक सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी आहे.जंगलाची व तेथील घडणाऱ्या घटनांची एक सुंदर सफर घडवून आणते.जे वाचत असताना आपण आजूबाजूचं भान विसरून यामध्ये हरवून जातो.शेकरा या कादंबरीने जंगलातील जीवनाचे अनुभवविश्व साकारले आहे.ही छोटीशी पण गोंडस कादंबरी वाचत असताना आपण जणू जंगल विश्व प्रत्यक्षात बघतोय,अनुभवतोय असा भास आपल्याला काही वेळा होतो.आपण आपले सर्व जीवनविषयक सगळे प्रश्न,समस्या,ताणतणाव विसरून या कादंबरीतील सर्व भीषण नाट्य आणि अनुभवविश्व न्याहाळत राहतो.सगळ्या जंगलातील प्राणिविश्व संबंध कादंबरीभर नैसर्गिकपणे पसरले आहे. त्यात शेकरा, काळतोंडे हुप्पे, माकडं, वाघ, हरणं, सांबरं, भेकरं, अस्वल, गवे, घारी-गिधाडे, ससाणे, खोकड, मोर, इतर पक्षी, वनस्पती, पाऊस, पाणी, कडे, पहाड, डोंगर, पाण्यांचे विविध प्रवाह हे सर्व अतिशय नाट्यपूर्णतेने आणि जिवंतपणे, त्यांच्या अनेक जिज्ञासावर्धक हालचालींसह आपल्याला आपल्या समोर फिरताना दिसतात.

या कादंबरीचा नायक आहे शेकरा. काळी , झुबकेदार शेपूट असलेला आणि राखी रंगाचा हा खारीच्या जातीचा शेकरा.हा या झाडावरून त्या झाडावर झेप घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या खाद्यासाठी सर्व जंगलभर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत हिंडता - फिरताना , सर्व ऋतूंमधली तिथल्या प्राण्यांची जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड आणि कधीकधी हतबल होऊन केलेला भीषण जीवन संघर्षही तो बारकाईनं न्याहाळतो .पुष्कळवेळा तो जमिनीवरही येतो. हा 'शेकरा' दिवसभर जंगलात भटकत असतो. त्याच्या भटकण्यात बराचसा क्रीडाभावच असतो. निरनिराळ्या जंगली झाडांवरची फळे खात तो हिंडतो. विविध फळांचे आणि रसांचे आस्वाद घेत हिंडण्याच्या त्याच्या प्रकृतीत स्वभावतःच भटकेपणा आहे. जोडीला जंगलात चाललेले वन्य पशूंचे जीवननाट्य तो आपल्या बिटबिट्या, जिज्ञासू डोळ्यांनी सतत दुरून पाहत असतो. या पाहण्यातही थंड अलिप्तता नसते. भरपूर उत्कंठा असते. जमेल तिथे सहभाग असतो, पलायन असते. पाहताना होणाऱ्या शारीरिक प्रतिक्रियाही भरपूर असतात.

लेखकांनी हे सारं चित्रण शेकऱ्याच्या नजरेनं,दृष्टीने केलेलं आहे. जंगलातल्या जवळपास हर एक झाडावर त्याने त्याची घरटी बांधून ठेवलेली आहे.आणि त्याच घरट्यांमधून तो संपूर्ण जंगल जीवन आपल्या शेपटीचा झुपकेदार गोंडा मिरवत पाहत असतो.कड्यावरून कोसळणाऱ्या प्रपाताच्या होणाऱ्या प्रवाहावर पाणी प्यायला येणार सगळं जंगल ,कपारीतून धडकी भरवणारी डरकी फोडणारा वाघ , कुठलाही मागचा पुढचा विचार न करता वाघाशी भिडणारा गवा,मधाच्या शोधात जमीन हुंगत निघालेलं अस्वल , मादी सोबतच्या क्रीडेत दंग असलेला महाभुजंग , जमिनीवर न उतरता या झाडाहून त्या झाडावर फिरणारे काळतोंडी हुप्पे , जबडा वासून दात स्वच्छ करून घेणारी सुसर तर तिच्या दातातले मांस खाऊन तृप्त होणारे पक्षी , कान टवकारून सावधपणे पाणी पिणारे चितळ , गंडस्थळावरून वाहणाऱ्या मदाने मत्त झालेला गजेंद्र,डोहाच्या काठावर सावजाची वाट बघणारा अजगर,  या सगळ्यांशी आपली ओळख करून देणारा शेकरा हा संपूर्ण जंगल आपल्या डोळयांसमोर जिवंत करतो.

हा नायक निस्वार्थी आहे.इतरांची मदत करणारा जबाबदार प्राणी आहे.जंगल आणि येथील प्राण्यांवर प्रचंड प्रेम करणारा आहे.जंगलात वणवा पेट घेतो.जंगल खाक होऊन जातो.सर्व प्राणी , पक्षी  दुसऱ्या जंगलात निघून जातात.पण शेकरा हा जंगल शेवटपर्यंत सोडत नाही.या रानानं एवढं सुख दिलं, जगवलं, वाढवलं त्या रानाला वाईट दिवस आले म्हणून त्याला सोडायचं ?सारे प्राणी गेले ,म्हणून आपण सुद्धा जायचं.या  विचाराने सुन्न होऊन. तो जंगलाच्या पुर्नउभारणीची वाट पाहतो. या सगळ्यात त्याला सोसाव्या लागणाऱ्या यातना , एकाकीपणाची वेदना लेखकाने ज्या शब्दांत, प्रसंगात मांडली आहे ते नकळत आपल्याला हेलावून जातात..

शेवट वाचून आपण अंतमूर्ख होतो.आणि कुठलीही पूर्वकल्पना न केलेला हा प्रवास अनपेक्षितपणे संपल्याचा मनाला खूप दुःख होतो एवढं मात्र नक्की.

नक्की नक्की वाचा 😘

©Moin Humanist ✍️
मी वाचलेली पुस्तके ❤️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼