मुकद्दर 🌼💜

स्वप्नील कोलते-पाटील लिखित मुकद्दर ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केली. प्रथम ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा लगेच मागवून वाचली होती. पण तेव्हा जाणूनबुजून याबद्दल काहीच लिहिलं नव्हतं. कारण, मुखपृष्ठावरील औरंगजेबाचे चित्र पाहून अनेकांनी एक चुकीची समजूत करून घेतली होती की,"ही कादंबरी औरंगजेबाचे उदात्तीकरण करते वगैरे.म्हणून मी ठरवलं होतं की, थोडा काळ जाऊ दे, शांतपणे आपला अनुभव लेखकांपर्यंत पोचवू. पण आज मनात सलते की, ते शक्यच झालं नाही. स्वप्नील सर आपल्यात राहिले नाहीत नि आपण त्यांच्याशी कधीच संवाद साधू शकलो नाही, याची खंत कायम राहणार आहे.

"महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी औरंगजेब समजून घ्या"

गुरुवर्य दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचे हे वाक्य जणू या कादंबरीची प्रस्तावना आहे. मुकद्दर ही औरंगजेबाच्या चरित्रावर आधारित नसून, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा 'दुसरा पैलू' उलगडून दाखवते एक असा पैलू जो इतिहासाच्या मुख्य प्रवाहात क्वचितच दिसतो.कादंबरी वाचताना कुठेही औरंगजेबाचे उदात्तीकरण जाणवत नाही. उलट, अत्यंत अभ्यासपूर्वक नि वस्तुनिष्ठतेने लिहिलेली ही कादंबरी वाचकाला औरंगजेबासोबतच मराठ्यांच्या शौर्याचीही नवी ओळख करून देते.

स्वप्नील सरांनी या कादंबरीच्या लेखनासाठी जे परिश्रम घेतले, ते थक्क करणारे आहेत. निकोलाओ मनुची, फ्रेंच व्यापारी तर्हेनिए, बर्नियर, फ्रायर यांच्यासारख्या परदेशी लेखकांच्या नोंदींतून मोगल इतिहासातील अनवट कोपरे उलगडले आहेत. औरंगजेबाचे विजय फार मोठे करून दाखवले गेले नि पराभव दडपले गेले हे लेखक स्पष्टपणे दाखवतात.

कादंबरी वाचताना जणू आपण त्या काळात जातो – बुऱ्हाणपूर, आग्रा, औरंगाबाद, महाराष्ट्रातील मराठा सरसेनापती, संभाजी राजांचा बलिदान, ताराबाईंचा संघर्ष या सगळ्या घटना एका नव्या दृष्टीकोनातून समोर येतात.लेखकांनी सांगितलेली सर्वात अंतर्मुख करणारी गोष्ट म्हणजे, तत्कालीन काळात राजकीय कृत्यांना धर्माच्या आधारावर योग्य ठरवण्याची पद्धत. औरंगजेबाने केलेल्या क्रूरतेला केवळ धर्मांधपणा म्हणून न बघता, त्या काळातील राजकीय व्यवहारांचा भाग म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन लेखक मांडतात.

हे करताना, कुठेही औरंगजेबाची बाजू घेण्याचा अट्टहास नाही, की मराठ्यांचा गौरव कमी करण्याचा हेतू नाही. उलट, महाराजांच्या उंचीला समजून घेण्यासाठी औरंगजेबाच्या उंचीचेही मूल्यमापन आवश्यक आहे, हे त्यांनी अतिशय संयमाने मांडले आहे.

या कादंबरीविषयी आपले विचार लेखकांपर्यंत पोचवता न आल्याची खंत माझ्या मनात कायम राहणार आहे. स्वप्नील सरांनी "मुकद्दर" लिहिली, ती त्यांच्या लेखणीची पहिली नि शेवटची कादंबरी ठरली, ही गोष्ट फार चटका लावणारी आहे.शरद तांदळे सरांनी स्वप्नील सरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मला दिलेला पुरस्कार ऐकून एक वेगळीच भावना मनात दाटून आली होती जी शब्दांत मांडता येणार नाही. आपण त्या  लेखकाला कधी भेटू शकलो नाही, ही एक सल मनात घर करून बसली आहे.

शेवटी एवढंच म्हणेन की,

मुकद्दर ही केवळ ऐतिहासिक कादंबरी नाही, ती एका काळाच्या, एका मानसिकतेच्या नि एका समांतर इतिहासाच्या गूढ प्रवासाची नोंद आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता, ही कादंबरी वाचावी कारण ती वाचकाला फक्त औरंगजेब नव्हे, तर त्याच्या विरोधात उभा ठाकलेला मराठा स्वाभिमानही नव्याने समजून देते.

स्वप्नील सरांच्या स्मृतीस श्रद्धांजली...🌼🌾

टिप्पण्या

  1. माझे आवडते लेखक स्वप्नील कोलते सर कायम त्यांना न भेटल्याची उणीव राहील, मुकद्दर नंतर त्यांच्या अजून लिखाणाचा शोध घेतला तर त्यांचा उनाड कविता संग्रह मिळाला कधीही कविता न वाचणारा मी त्यांच्या कवितांचा मात्र चाहता झालो

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼