फिडेल,चे आणि क्रांती 💜
काही दिवसांपूर्वीच अरुण साधू सर लिखित हे पुस्तक वाचलं. फिडेल कास्ट्रो, अर्नेस्टो चे गेव्हारा यांनी क्युबा सारख्या छोट्याशा देशात केलेल्या अफाट क्रांतीचे आणि त्याकाळी घडलेल्या ऐतिहासिक घटनांचे वर्णन या पुस्तकात खूप उत्कृष्ट,विलक्षण आणि रोचक पद्धतीने केले आहे.अमेरिकेसारख्या देशाला न जुमानता त्याला गंभीरपणे दिलेली टक्कर याला इतिहासात खरंच तोड नाही.साम्राज्यावाद व भांडवलवादाविरुद्ध पुकारलेल्या या बंडाला इतिहासात एक वेगळेच स्थान आहे.त्रुटक सैन्यबळ,शस्त्रसाठा आणि संसाधन असताना फक्त आणि फक्त अफाट इच्छाशक्ती,जिद्द आणि हिम्मतीच्या जोरावर केलेली ही क्रांती अनेकांना प्रेरणा देणारी आहे..फिडेल कास्ट्रो,चे गव्हेरा आणि यांच्या क्यूबन क्रांतीविषयी मी पूर्वी ऐकलं होतं,वेगवेगळे ब्लॉग्स,लेख वाचले होते व्हिडिओस बघितले होते.पण एवढ्या deep मध्ये माहिती प्रथमच मला या पुस्तकाने दिली..चे गव्हेरा हा क्रांतिकारक भगत सिंहासारखा नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी दिसायचा.Tshirt, Tea Mug आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी याचे फोटोस असायचे.पण तेव्हा या अवलियाला समजून घेण्याची माझ्यात समज नव्हती यांच्याबद्दल आपण वाचू असं कधीच वाटलं नाही त्यामुळे एवढं इंटरेस्ट देऊन काही वाचलं नव्हतं..पण मागे हे पुस्तक एका मित्राने Recommend केलं आणि माझी प्रतिक्रिया मागितली म्हणून मी हे पुस्तक हाती घेतलं आणि एकाच बैठकीत वाचून संपवलं सुद्धा..आता एकंदरीत मी चे आणि फिडेलचा जबरदस्त चाहता झालोय,मला यांच्यापासून एक नवीन प्रेरणा मिळाली,खूप काही शिकायला मिळालं आहे जे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही..क्रांती म्हणजे प्रस्थापित समाजव्यवस्था तळापासून ढवळून काढून नवी,न्यायी,सर्वांना समान वागणूक देणारी समाजव्यवस्था निर्माण करणे हा क्रांतीचा एक वेगळाच अर्थ या क्रांतिकाऱ्यांनी जगाला समजावून दिलं आहे..
अवघ्या 12 प्रकरणात लेखकांनी ज्याप्रकारे या विषयाला न्याय दिलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे.एकदम सोप्या आणि मुद्देसूद भाषेत लेखकांनी हे पुस्तक लिहलं आहे.जे वाचत असताना आपण जणू त्या काळातील घटना प्रत्यक्षात बघत आहोत की काय असा भास आपल्याला होतो.ज्याप्रमाणे लेखकांनी त्याकाळात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे ते खरंच रोचक आणि इंटरेस्टिंग आहेत.एकदा हातात घेतल्यावर पुस्तक खाली ठेवताच येत नाही एवढं आपण यामध्ये गुंतून जातो.पुस्तकातून महत्वपूर्ण आणि नवीन माहिती आपल्याला मिळतेच त्यासोबतच देशासाठी, समाजासाठी कार्य करण्याची प्रेरणा सुद्धा मिळते...छोटेखानी म्हणजेच फक्त 118 पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकातुन आपल्याला अनेक महत्वपूर्ण बाबी माहिती पडतात..फिडेल,चे आणि इतर क्रांतिकाऱ्यांच्या संघर्षाबद्दल वाचत असताना आपले डोळे पाणावतात आणि सारखा सारखा एकच प्रश्न मनात येतो की, हे क्रांतिकारक खरंच कुठल्या आणि कोणत्या मातीचे बनले असतील ??अफाट इच्छाशक्ती, काहीही झालं तरी मागे न हटण्याची यांची जिद्द,वेगवेगळ्या विषयांवर यांचा असलेला प्रचंड वाचन,अभ्यास,आपल्या देशासाठी,समाज बांधवांसाठी वाट्टेल ते करायची तयारी,कितीही क्रूर अत्याचार केले तरीही हे आपल्या विचारांवर ठामच असतात..यांना खरंच ही प्रेरणा कोठून मिळत असेल बरं ??आपलं घर दार सोडून हे देशासाठी हसत हसत मरायला का तयार होत असतील ??खरंच हे क्रांतिकारक कुठल्या मातीचे बनलेले असतील ?? यांच्या नखाची सुद्धा सर आपल्यात आली तरी आयुष्यात आपण खूप काही हासिल करू शकतो एवढं नक्की.
अमेरिकेपासून अवघ्या 90 मैलांवर असलेला क्युबा हा छोटासा द्वीप देश/बेट .1952 मध्ये हुकूमशाह फुल्जेन्शो बाटिस्टा याने लष्करी बंडाने क्यूबाची सत्ता बळकावली व येथे आपली हुकूमशाही राजवट प्रस्थापित केली..त्याच्या कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे बटिस्टा अमेरिकेचा पाठिंबा मिळवण्यात सुद्धा यशस्वी झाला..अमेरिकेने बाटिस्टाला समर्थन दिले. क्यूबाच्या जनतेमध्ये त्याच्याविरुद्ध असंतोष पसरला.बाटिस्टाच्या हुकूमशाही, जुलमी,भ्रष्ट राज्यकारभाराने क्युबामध्ये हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती.आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी व या हुकूमशाही राजवटीला धुळीस मिळवण्यासाठी.फिडेल कास्ट्रो,राऊल गव्हेरा आणि इतर काही तरूण युवक पुढे आले आणि यांनी मार्ग निवडला तो सशस्त्र क्रांतीचा..आणि या क्रांतीत फिडेल आणि इतर क्यूबन बंडखोरांना मोलाची आणि मुख्य साथ दिली ती मूळचा अर्जनेटियन असलेल्या धाडसी चे गव्हेरा या अवलियाने..फिडेल कास्ट्रोने आपली क्रांतिकारक मोहीम 26 जुलै 1953 रोजी सुरू केली. या चळवळीचं नावचं "सव्वीस जुलै" चळवळ ठेवण्यात आलं.सांत्यागो येथील मोकांडा लष्करी छावणीवर हल्ला करून तेथील शस्त्रास्त्रे काबीज करावयाची व मग त्याच्या साहाय्याने इतर सत्ताकेंद्रे ताब्यात घ्यावयाची, अशी ती योजना होती. कास्ट्रोच्या या पहिल्या क्रांतिकारक हल्ल्यात फक्त 160 तरुण सामील झाले होते. हा हल्ला अयशस्वी झाला. यामध्ये बरेचसे बंडखोर मृत्युमुखी पडले व असंख्य जखमी झाले..स्वतःफिडेलला सुद्धा तुरुंगात टाकण्यात आले.फिडेलने हा पराभव पचविला आणि या पराभवानेच त्याने आपल्या भावी जीवनाची बीजे पेरली..या पराभवाचे भांडवल करून त्यावर आपल्या क्रांतीच्या भावी विजयाची त्याने जोरदार मूहुर्तमेढ रोवली.यानंतर अवघ्या साडेसहा वर्षांच्या आत फिडेलने असंख्य आणि किचकट परिस्थितीचा सामना करत क्रांतिकारकांचा नेता म्हणून याचं मोकांडा बराकीमध्ये भाषण दिले..
26 जुलै 1953 ते 1 जानेवारी 1959 दरम्यान चाललेल्या ह्या क्यूबन क्रांतीचा शेवट बाटिस्टाची सत्ता उलथवण्यात झाला.या कालावधीत या देशासाठी झगडणाऱ्या क्रांतिकाऱ्यांनी किती कष्ट सोसले ?? किती अत्याचार सहन केले ??यांचे किती हाल झाले ?? याबद्दल वाचूनच आपण भारावून जातो..पुस्तकात असे असंख्य वर्णन वाचून अंगावर काटा येतो.चे गव्हेराचा शेवट वाचताना तर थक्क व्हायला होते..आणि एक वेगळीच ऊर्जा आपल्या अंगी संचारते एवढं नक्की...
शेवटी कुमार केतकर सर म्हणतात तेच खरे की,
फक्त आपल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर एखादा धडाडीचा क्रांतिकारक भल्याभल्यांना कसा नामोहरम करू शकतो, फिडेल कॅस्ट्रोंनी जगाला दाखवून दिले तसेच चे गव्हेरासारखा क्रांतिकारक आजही जगातल्या लाखो
तरुणांचा कसा रोमँटिक हिरो होतो, हेही आपण गेल्या चाळीस वर्षांत पाहिले आहेच..'फिडेल, चे आणि क्रांती' या पुस्तकात अरुण साधूंनी या अतर्क्य वाटणाऱ्या ऐतिहासिक
घटनांचे तर्कशास्त्र वाचकांसमोर विलक्षण वेधकतेने सादर केले आहे जे खूपच वाचनीय आहे..❤️💜
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा