पुस्तकांनी मला काय शिकवले किंवा मी आजपर्यंत पुस्तकापासून काय शिकलो ?? भाग :- 1 💜


 पुस्तकांनी माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव पाडलेलं आहे.पुस्तकांनी मला नेहमीच योग्य ती दिशा दाखवण्याचं कार्य केलं आहे.पुस्तकांनीच मला घडवलंय.योग्य ते लिहायला,बोलायला आणि वागायला शिकवलं आहे.आज मी पदवीधर झालो,नागरी सेवेची तयारी करतोय आणि पुढे उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या प्रवेशासाठी तयार होतोय तर ते फक्त पुस्तकामुळेच.पुस्तकानेच मला स्वप्न बघायला आणि ती स्वप्न पूर्ण करायला शिकवलंय..शाळेत व्यवस्थित निबंध सुद्धा न लिहू शकणारा आज मी थोडंफार लिहू शकतो हे फक्त पुस्तकामुळेच.दहावी पास व्हायची सुद्धा खात्री नसणारा मी पदवीधर झालो ते फक्त पुस्तकामुळेच.वाया गेलेला पोट्ट आहे तो त्याचं काही खरं नाही पासून तर एक सुशिक्षित आणि अभ्यासू मुलगा आहे तो भविष्यात तो एक अधिकारी बनणार आहे इथपर्यंत चा प्रवास मी पूर्ण करू शकलो ते फक्त पुस्तकामुळेच.पुस्तक वाचनाने मी आज घडलोय आणि घडतोय.पुस्तकांमुळेच माझ्या विचारांत आमूलाग्र बदल झाले आहेत.पुस्तकांनीच योग्य त्या वेळेवर मला साथ दिली.जेव्हा कोणीही जवळ नव्हतं तेव्हा पुस्तके माझ्या जवळ होती आणि आज सर्वजण आहेत तेव्हासुद्धा पुस्तके माझ्या सोबतच आहे.पुस्तकांनी आयुष्यात मला कधीही एकटं सोडलं नाही.जेव्हा सुद्धा मला कोणाला तरी बोलावं वाटायचं तेव्हा मला बोलणारी,माझ्याशी संवाद साधणारी माझी पुस्तकेच होती.नैराश्य सारख्या भयंकर आजारातून मला बाहेर काढणारी सुद्धा माझी पुस्तकेच होती.त्यांना वाचून,त्यांना बोलून,त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालूनच मी आज इथपर्यंत चा यशस्वी प्रवास पूर्ण करू शकलो.

आयुष्यात काहीही झालं,कितीही संकटे आली तरीही हार मात्र मानायची नाही किंवा मागे फिरायचं नाही...लाथ मारेल तिथे पाणी काढायचं आत्मविश्वास आणि प्रत्येक संकटाचा सामना करायची हिम्मत मला माझ्या लाडक्या पुस्तकाने दिली आहे..मी भविष्यात कितीही पुढे गेलो किंवा कितीही व्यस्त असलो तरीही मी माझ्या पुस्तकांचा साथ आयुष्यभर सोडणार नाही एवढं मात्र नक्की आहे.मी फक्त पुस्तके वाचलीच नाही तर त्याचं आकलन सुद्धा केलं.फक्त वाचतच सुटलो नाही तर त्यावर गंभीरपणे विचार सुद्धा केलं..पुस्तके ही माणसाची चौथी मूलभूत गरज आहे आणि ती असायलाच हवी.पुस्तके माणसाला पूर्णपणे बदलायची ताकद ठेवतात .पुस्तक वाचनाने माणूस जागृत होतो.आयुष्यात विविध प्रसंगी काय करावे आणि काय करू नये याची समज माणसाला पुस्तके देतात.कोणी तरी म्हटल्या प्रमाणे खरंच पुस्तके ही काळाच्या विशाल सागरातून आपल्या घेऊन जाणारी जहाजे आहेत...

पुस्तक वाचनाने मला जे फायदे झाले आहेत याची यादी अमर्यादित आहे..पुस्तक वाचनाने मला झालेले फायदे या विषयावर मी एक पुस्तक लिहू शकतो.पुस्तक वाचनाने मला झालेले फायदे या विषयावर मी पुढे नक्की लिहिनच पण आज या लेखात मला पुस्तकांनी शिकवलेल्या किंवा मी पुस्तकांपासून शिकलेल्या व मला फायदा झालेले काही निवडक आणि उत्कृष्ट विचार आपल्या सोबत शेअर करतोय...

1) खऱ्या अर्थाने मोठा माणूस तोच असतो जो इतरांना छोटा समजत नाही.इतरांच्या मताचा आदर करून तो सर्वांना समान वागणूक देतो..कोणत्याही गोष्टींत वाद घालत बसत नाही..इतरांच्या बद्दल माघारी वाईट बोलत नाही.तो माणसे जोडतो,इतरांचा दुःख समजून घेतो.खऱ्या अर्थाने तोच मोठा माणूस असतो...

2)आपला कितीही मोठा शत्रू असेल तरीही एक दिवस तो आपल्याला कधीही डोळ्याने दिसणारं नाही.त्यामुळे आपण शत्रू करून,द्वेष पसरवून काय साध्य करतोय.एक दिवस तो आणि आपण सुद्धा येथे कायम राहणार नाही त्यामुळे ही दुष्मनी काय कामाची.आजपर्यंत आपल्या नजरेसमोरून गेलेले असंख्य चेहरे जे भविष्यात आपल्याला कधीही डोळ्याने दिसणारं नाही हा विचार करूनच किती दुःख होतो.त्यामुळे समाजात फक्त प्रेम पसरवायचं द्वेष तर आधीपासूनच आजूबाजूला खूप आहेच.

3)मुक्या प्राण्यांना जीव लावायचं.त्यांना बोलायचं, त्यांना गोंजारायचं, प्रेम करायचं.त्यांना खायला द्यायचं.त्यांना अजिबात मारायचं नाही.त्यांना सुद्धा प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते.त्यामुळे त्यांना नेहमी प्रेमच करायचं..त्यांच्याकडून सुद्धा खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात त्या आपण शिकायचं प्रयत्न करायचं.

४)नेहमी महिलांची इज्जत करायची. महिलांना नेहमी मान, सन्मान द्यायचं.महिलांना कधीही कोठेही कमी समजायचं नाही.महिला कोठेही आणि कशातच कमी नाही.स्त्री ही नेहमी सर्वोच्च असून स्त्री सारखा जिगर,हिम्मत कोणत्याही व्यक्तींमध्ये नाही.स्त्री म्हणजेच शक्ती.

५)पुरुष, महिला आणि तृतीयपंथी असा भेदभाव कधीही करायचं नाही.आपल्याला तो अधिकार नाही.कोणतं लिंग प्रथम आणि कोणतं द्वितीय हे ठरवणारे आपण कोण ??निसर्गाला सर्व समान त्याप्रमाणे सर्वांना समान मानायचं.

६)पृथ्वी तळावर जिवंत असणारे सर्वंच माणसं,जनावरे,पशु-पक्षी हे आपलेच आहेत..ते परके नाही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोणीही परकं नाहीच.

७)जात,धर्म,पंथ,वंश,वर्णापेक्षा माणूसकीचं नात हाच सर्वांत सर्वोच्च नातं असून.माणुसकीच्या नात्याला तोड नाहीच.त्यामुळे नेहमी माणूस म्हणूनच जगायचं.

८)भरपूर वाचायचं, समजून घ्यायचं तेव्हाच कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवायचं.डोळेझाप करून कोणत्याही गोष्टी बद्दल विचार,विमर्ष न करता सरळ सरळ विश्वास अजिबात करायचं नाही.व्हाट्सअप्प विद्यापीठात फिरणाऱ्या पोस्टीं वाचायच्या नाहीच त्यामध्ये काहीही तथ्य नसतो.

९)जेवढं शक्य होईल तेवढं हिंसेपासून लांब राहायचं.हिंसेने कोणताही प्रश्न सुटत नसतो तर अधिकच बिघडतो.हिंसेपासून आजपर्यंत कधीही कोणाचाही भलं झालेलं नाही.हिंसेने नुकसान कोण्या एकाच होतं नाही तर सर्वांचा होतो.

१०)मूर्खाशी वाद घालू नये.त्यांना Exaplain करत बसू नये.समोरचा व्यक्ती आपल्या बद्दल काय विचार करतो,तो आपल्याला काय समजतो याने आपल्याला काहीही फरक पडता कामा नये.आपण आपलं काम करत राहायचं,इतर वाद घालणाऱ्या लोकांपासून लांब राहायचं..

११)नेहमी सकारात्मक राहायचं,प्रत्येकाला प्रेमाने बोलायचं.नकारात्मक विचार करायचे नाही.नकारात्मक विचार आल्यावर,दुःखी असल्यावर किंवा खूप आनंदी असल्यावर"यह समय भी बीत जायेगा"हा वाक्य लक्षात आणायचं आणि काम करत राहायचं.

१२)पैसा जपून ठेवायचं,गरज नसताना पैसा फालतू वाया घालवायचा नाही.पैसा हा भविष्याचा आधार असतो.पैसा हा सर्वोच्च जरी नसला तरीही पैश्या शिवाय कोणतेही काम आजच्या युगात होत नाही हे सुद्धा तितकेच खरे..

१३)आईवडिलांचा नेहमी आदरच करायला हवा.आईवडिलांच्या पेक्षा कधीही कोणीही मोठा नाही.त्यांना कधीही दुःखी करायचं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे नेहमीच स्मित असायला हवा हा प्रयत्नन करायचं. आईवडील सुखी तर सर्व जग सुखी.

१४)कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा आपल्याला अधिकार नाही . आपल्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावनेला आहत पोहचू नये यासाठी नेहमी प्रयत्न करायचे.ज्याला जसे पटेल त्याला तसे आयुष्य जगायचं अधिकार आहे.

१५)नेहमी जमेल तेव्हा शक्य होईल तेवढी इतरांना मदत करत राहायची.कोणी आपली मदत करो अथवा न करो पण आपण नेहमीच सर्वांची मदत करायची.प्रत्येकाच्या सुखा दुखात सहभागी व्हायचं प्रयत्न करायचं.मदत करताना ती निस्वार्थी करायची,कुठलाही स्वार्थ मनात ठेवायचं नाही...

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼