प्रतिपश्चंद्र 💜
१७ जून २०२० रोजी संध्याकाळी ही कादंबरी मला येऊन मिळाली..आणि लगेच ७ वाजेपासून मी बाकी काम बाजूला सोडून ही कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि २१ जून २०२० रोजी दुपारी या अप्रतिम कादंबरीचा माझा एक विलक्षण व रोचक प्रवास समाप्त झाला...डॉ.प्रकाश कोयाडे सर लिखित या कादंबरीबद्दल तसे तर माझ्याजवळ काही शब्दच नाही पण इतरांना सुद्धा या ग्रेट कादंबरी बद्दल माहिती व्हावी यामुळेच आज मी मागील वर्षी लिहलेले माझं अनुभव येथे शेअर करतोय...एकंदरीत ही कादंबरी माझ्या मनात घर करून गेलेली आहे आणि मी यामध्येच सध्या हरवलेलो आहे..
कधी कधी कसं एखाद्या चित्रपट अथवा पुस्तकाचा हँगओव्हर काही दिवस आपल्या मनातून उतरत नाही, आपण त्यामध्ये एकदमच हरवून जातो ही कादंबरी त्यातुनच एक आहे..जी वाचून समाप्त झाल्यावर सुद्धा आपला पिच्छा सोडत नाही.आपल्या हृदय व मनावर ताबा घेते।।कादंबरीतील एकएक पात्र आपल्या हृदयात घर करून जातो.(रवि, आदित्य,प्रियल,प्रशिक,अजित माने,ज्योती,रामचंद्रन आणि चंद्रकांत मोरे) आपण एखाद्या पात्राला स्वतःशीच रिलेट करत जातो जणू तो पात्र आपणच आहोत कधी त्या पात्राला काय झालं तर आपल्याला स्वतःलाच काही झालं की काय अशी भावना निर्माण होते.. आपण हृदयाने त्या पत्रासोबत जुडून जातो त्या पात्रासारखं आपण वागायला/बोलायला सुरुवात करतो..एवढ्या सुंदर आणि अप्रतिमपणे प्रत्येक पात्राला रंगवण्यात आलं आहे..जे भन्नाट आहे.
ही कादंबरी एक रोलर कोस्टर आहे जी आपल्याला भूतकाळात नेऊन इतिहासातील १३,१६ व्या शतकात घडलेल्या काही महत्वपूर्ण घटनेची सैर करून आणते,घरबसल्या बसल्या आपल्याला औरंगाबाद,अंजिठा/वेरूळ लेण्या,मुंबई,मंत्रालय/राजभवन,गेटवे ऑफ इंडिया, हम्पी,रायगड,विजयनगर साम्राज्य,कैलास मंदिर ,आणि इत्यादी महत्वपूर्ण ठिकाणांचे खूप जबरदस्त पद्धतीने दर्शन घडवते जे वाचून आपण तेथे कधी भेट देतो असे होते..आपल्याला आयुष्यामध्ये उपयोगी पडणारे खूप धडे/lessons देते -जीवनाचे तत्वज्ञान,फिलॉसॉफी, मित्र/प्रेम/कुटुंबाची गरज इत्यादी..इतिहासातील खूपच कमी माहिती असलेल्या अज्ञात गोष्टी बद्दल उदाहरण - स्वामी विवेकानंद मांसाहारी होते,पंचमहाभूतांच प्रतीक असणारी ५ मंदिरे,छत्रपतींच्या तलवारीवर IHS अशी अक्षरे असणे,वेरूळ येथील लेण्या,इत्यादी..कधीही न विचार केलेल्या गोष्टीवर विचार करायला भाग पाडते उदा:- डार्विनचा सिध्दांत,श्रावण मध्ये मांसाहार न करणे,कटपायादी संकल्पना,दशावताराचा मानवाशी संबंध इत्यादी इत्यादी असंख्य गोष्टी आपल्याला या रोलर कोस्टर मध्ये वाचायला मिळतात.जे वाचून आपण लेखकाच्या अभ्यासाला/कष्टाला सलाम केल्याशिवाय राहत नाही..💜
कादंबरी वाचत असताना आपल्याला धक्क्यावर धक्के मिळत जातात पुढच्या पेजवर आता नेमकं काय दडून ठेवलं आहे ?? हे बघण्यासाठी आपली उत्सुकता वाढत जाते..ही कादंबरी आपल्याला कोठे खूप हसवते तर कुठे अक्षरशः रडवते.आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या बाबीवर विचार करायला भाग पाडते.एकंदरीत जगण्याची प्रेरणा देते.जीवनातील खूप साऱ्या गोष्टीच महत्व पटवून देते, खूप काही नवीन शिकवते तर छत्रपती शिवराय, बहिर्जी नाईक व शिवमावळ्यांच्या अफाट पराक्रमांबद्दल/आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल अभिमानाने गर्व करायला भाग पाडते..अफाट बुद्धिमत्ता असलेले छत्रपती शिवाजी महाराज, गुप्तहेर बहिर्जी नाईक,विजयनगर साम्राज्य येथील लपवलेला खजिना या इतिहासाला धरून काल्पनिक रित्या गुंफलेली ही कथा वाचत असताना आपण अनेक जागी निःशब्द होतो..उदा:-जेव्हा रवीला शिवरायांचा खंजर सापडतो,शिवरायांच्या गळ्यातील ती माळ सापडते,राजेंच सिंहासन सापडतो इत्यादी ठिकाणी तर आपण अक्षरशः रडल्याविना राहूच शकत नाही.💜
Dr.Prakash Koyade सरांनी लिहलेली ही कादंबरी एक उत्कृष्ट-जबरदस्त-अफलातून रहस्यमयी कादंबरी आहे जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नक्कीच वाचली पाहिजे..मला आवडलेल्या १० कादंबऱ्यामध्ये मी याला शामिल केलंय कारण ही कादंबरी सर्वोत्तम आहे..संभाजी,श्रीमानयोगी,महानायक,पानिपत,
झाडाझडती,झोंबी,मृत्युंजय,ययाती,स्वामी आणि आता प्रतिपश्चंद्र या माझ्या हृदयाच्या जवळ असलेल्या १० कादंबऱ्या आहेत...प्रकाश सरांनी ४ वर्षे MBBS ची नौकरी सोडून केलेली मेहनत व अभ्यास या कादंबरीतुन आपल्याला दिसते... बारीक बारीक/छोट्या छोट्या गोष्टींवर सरांनी विशेष ध्यान दिलेलं आहे,प्रत्येक प्रश्नांच उत्तर कादंबरीतुन देण्यात आलंय कादंबरी वाचून झाल्यावर आपण असं कदापि म्हणू शकत नाही की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही अथवा लेखक उत्तर देणे विसरले आहे वगैरे..कादंबरी वाचून झाल्यावर आपण पूर्णपणे संतुष्ट होतो आणि यामध्येच लेखकाची जीत आहे..खूपच सोपी भाषा,सुंदर मांडणी आणि वाचकाला पुढे काय होईल याची उतकंठा वाढवत जाणारी भन्नाट/अफलातून कथा एवढ्या पद्धतशीरपणे गुंफली आहे की विचारूच नका...एक सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट/वेबसिरीज या पुस्तकावर तयार होऊ शकतो यात काहीच दुमत नाहीच आणि भविष्याबद्दल एखाद्या दिगदर्शकाने यावर चित्रपट बनवला तर मला खूपच आनंद होईल..कादंबरी वाचतानाच आपल्याला एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आपण बघत आहोत की काय ??असा भास होतो जणू हि कथा आपल्यासमोरच घडत आहे आणि आपण याचा एक भाग आहोत अस आपल्याला वाटते...
आता या कादंबरीबद्दल लिहण्यासारखे खूप काही आहे पण येथे इच्छा असूनही लिहू शकत नाही कारण ही एक रहस्यमयी कथेवर आधारित कादंबरी आहे ज्यामधील एकही रहस्याचा खुलासा मी येथे करूच शकत नाही अथवा स्पोयलर देऊ शकत नाही त्यामुळे थोडक्यात येथे फक्त कथेचा गाभा लिहू इच्छितो..
#भूतकाळ....✍️
१५ व्या शतकात दक्षिणेकडील एकीच्या बळावर भरभराटीस "विजयनगर हे साम्राज्य आले होते..विजयनगराची राजधानी #हम्पी हे एक सुंदर श्रीमंत आणि पूर्णपणे समर्थ असलेलं शहर होते..विजयनगरातील प्रत्येक घरामध्ये सोने,हिरे व चांदीच्या राशी होत्या.तेव्हा इतर ठिकाणी चलन म्हणून तांब्याची नाणी होती तेव्हा येथे फक्त सोन्याची नाणी असतं.पण जेव्हा काळ बदलला तेव्हा २०० वर्षं यशाच्या उच्च शिखरावर असलेला विजयनगर साम्राज्याला उतरती कळा लागायला सुरुवात झाली..कृष्णदेवराय या राजाच्या नंतरचे सर्व राजे कमकुवत निघाले आणि यामुळेच हा साम्राज्य विनाशाच्या उंबरठ्यावर आला..
सोळाव्या शतकाच्या मध्यावर हा साम्राज्य पुन्हा थोडा हुशार झाला पण तो पर्यत वेळ निघून गेली होती.. जास्त काळ टिकून राहण्याची अपेक्षा दिसत नव्हती.आज ना उद्या हे साम्राज्य लयास जाणार ही अफाट संपत्ती बहामनी सत्तेच्या हातात जाणार ही चिन्हे दिसत होती.त्यामुळे पूर्ण विचार करून रामरायाने निर्णय घेऊन विजयनगरची संपत्ती एकत्र जमा करायला सुरुवात केली.साम्राज्यातील सोने,नाणी,चांदी,हिरे,मणिके सर्व एकत्र करायला सुरुवात केली व एक दिवस ही सर्व संपत्ती हत्तीच्या पाठीवर लादण्यात आली..तब्बल १६०० हत्ती ती संपत्ती घेऊन निघाले व हम्पी शहराच्या एका वाड्याखाली एक प्रचंड भुयार खोदन्यात आले व ही सर्व संपत्ती तेथे जमा करण्यात आली..त्यानंतर काही वर्षातच विजय नगरचा सूर्य मावळला..१७ व्या शतकात भारतीय इतिहासातील एका महान राजाने म्हणजेच छत्रपती शिवरायांनी त्यांच्या राज्यभिषेकांतर एक सर्वात मोठी मोहीम उघडली "#दक्षिण_दिग्विजय किंवा कर्नाटक स्वारी..शिवरायांचे जेवढे राज्य होते त्यापेक्षा दुप्पट आकाराचे राज्य त्यांनी या मोहिमेत मिळवले.
या स्वारीतून परत येत असताना शिवराय #चिदंबरम या देवस्थानी काही थांबले व तेथे व्यवस्थापन लावले.दक्षिण भारतातील महादेवाच्या ५ वैशिष्ट्यपूर्ण मंदिरापैकी एक चिदंबरम मंदिर आहे.तेथे एक दिवस मुकामी असताना महाराजांना भेटण्यासाठी लयाला गेलेल्या विजयनगरच्या साम्राज्यातील राजगुरू आले व त्यांनी शिवरायांना १६०० हत्तीवर लादून एका जागी लपून ठेवलेल्या खजिन्याबद्दल माहिती सांगितली व त्यांना त्याची जबाबदारी घ्यायला विनंती केली.महाराजांनी त्या खजिन्याचा उत्तराधिकारी न बनता त्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली.
आता शिवरायांनी पुढच्या एका वर्षाच्या काळात पूर्ण नियोजन केले आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक यांना सोबत घेऊन त्या खजान्याच्या रक्षणासाठी एक मोहीम सुरू केली.खजान्याचे रक्षक होते प्रत्यक्ष शिवराय आणि अफाट बुद्धीमत्ता असलेले बहिर्जी नाईक .या योजनेनुसार महाराजांच्या सूचनेप्रमाणे बहिर्जीनी त्यांच्या गुप्तहेर पथकातील ८ विशेष गुप्तहेरांना निवडले आणि त्यांना खजान्याचे शिलेदार बनवण्यात आले..भिंतीलाही समजणार नाही अश्या प्रकारे त्या शिलेदारांना खजान्याबद्दल माहिती देण्यात आली व त्यांनी शिवराय व भवानीच्या साक्षीने शपथ घेतली आणि आज ३५० वर्षानंतर सुद्धा त्या शिलेदाराचे वंशज त्या खजिन्याचे रक्षण करत आहेत असा सोपा या कादंबरीचा गाभा आहे..इतिहास व वर्तमानाला मिळून एक धागा जोडत लेखकांनी ही कथा गुंफली आहे...जी काबिल ए तारीफ आहे !!
वर्तमानकाळ ✍️
२०१६ साली अशातच या खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी न कळत रवि या तरुण डॉक्टरकडे येते (का ?) तो व त्याचा मित्र आदित्य या मध्ये न कळतच गुंतत जातात (कसे ??) आणि जसं जसं आपण पुढे जातो तसे अनेक रहस्य उलगडत जातात व नवीन नवीन पात्रांची ओळख आपल्याला होत जाते...रवी या कादंबरीचा हिरो/नायक आहे आता हिरो आहे म्हटल्यावर व्हिलन/खलनायक सुद्धा असणारच आणि तो सुद्धा साधा सुधा नसून हिरोच्या बरोबरीचा/तोडीसतोड आहे आणि तो या खजिन्याच्या मागे हाथ धुवून लागला आहे..आणि याच खजिन्याच्या पायी त्याने खूप जणांच्या हत्या केलेल्या आहेत आता हो खलनायक कोण ??त्याला या खजिन्याबद्दल माहिती कशी मिळाली ??तो खजिना रविला सापडतो का ??इत्यादी असंख्य प्रश्नांच्या उत्तरासाठी व एक सुंदर आणि अप्रतिम अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कादंबरी वाचावी लागेल त्यामुळे नक्क्कीच वाचा आणि इतरांना सुद्धा वाचायला सुचवा..मी आजपर्यंत असंख्य मित्रांना ही कादंबरी भेट म्हणून दिली आणि सर्वांना ती खूप आवडली आहे..
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा