चिखल घाम आणि अश्रू 💜
मला अनेक जणांनी सोशल मीडियावर हा प्रश्न नेहमी विचारला आहे की माझे सर्वात आवडते पुस्तक कोणते आणि ते आवडण्यामागचं नेमकं कारण काय ??तर या प्रश्नाचं आज मी उत्तर देतोय...
तसे तर मला मी वाचलेली सर्वंच पुस्तके काही अपवाद वगळता आवडलेली आहेतच.पण यामध्ये काही अशी विशिष्ट पुस्तके होती ज्यांनी मला त्यांच्या प्रेमात पाडलं, मनावर एक भुरळ पाडून त्यांनी माझ्या हृद्यात एक स्थान बनवलं आहे..या यादीत अनेक पुस्तके/कादंबऱ्या येतील ज्यांची यादी मी पुढे कधीतरी तुमच्यासोबत शेअर करणारच पण आज मी येथे माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ असलेल्या व माझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या पुस्तकाबद्दल लिहितोय आणि ते पुस्तक म्हणजेच बिअर ग्रील्स यांचे आत्मचरित्र "Mud Sweat And Tears चा मराठी अनुवाद "चिखल घाम आणि अश्रू हे एक अफलातून पुस्तक...या पुस्तकाने माझ्या आयुष्यात जे सकारात्मक बदल घडवले व आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन बदलला ते एखाद्या सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकाने सुद्धा बदलले नाही एवढं मी खात्रीने सांगू इच्छितो...
जिद्द,प्रबळ इच्छाशक्ती,मेहनत,धैर्य, प्रचंड कष्ट,आत्मविश्वास, प्रेरणा,धाडस,प्रेम,साहस,मैत्री,संघर्ष इत्यादी इत्यादी असंख्य शब्दांचे अर्थ आपल्याला बिअर सरांच्या या जीवनगाथेत समजतात..टीव्हीवर दिसणारा हा माणूस प्रत्यक्षात किती अफलातून आणि भन्नाट असेल याची प्रचिती आपल्याला हे पुस्तक वाचून येते.हे पुस्तक वाचल्यावर काय लिहावं आणि काय बोलावं हे समजतच नाही एवढं आपण या प्रवासात गुंतून जातो..पुस्तक वाचत असताना आपण जणू डोळ्याने हा प्रवास बघतोय असा भास आपल्याला होतो..ब्रिटिश स्पेशल फोर्सचा वर्णन वाचत असताना आपण थक्क होऊन जातो तर जेव्हा पॅराशूट अपघातात लेखकाच्या पाठीची ३ हाडे मोडून सुद्धा फक्त १८ महिन्यात बरा होऊन हिमालय पर्वत सर करतो ते सुद्धा फक्त वयाच्या २३ व्या वर्षी तेव्हा तर जिद्द नेमकी कशाला म्हणावे तर ती यालाच याची प्रचिती आपल्याला येते..आजपर्यंत बेअर ग्रील्स यांना आपण फक्त टीव्ही वर पाहत आलेलो आहे .. तो खूप साहसी आहे आणि तो किडे,साप वगैरे काहीही खातो त्यांची एवढीच ख्याती आपल्याला माहिती आहे पण तो त्याच्या खऱ्या म्हणजेच प्रत्यक्षात आयुष्यात कसा होता आणि आहे व त्याने कोण कोणते संघर्ष करून आपल्या जीवनात हे मोलाचे स्थान मिळवले ?? हे आपल्याला त्याच्या या आत्मचरित्रात वाचायला मिळते..माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला या पुस्तकामुळे ,जिद्द आणि धाडस बेअर ग्रील्स यांच्या कडून शिकावे असे मला वाटते...खरे तर हे पुस्तक नाहीच तर हा एखादा ऍक्शन चित्रपट आहे जो सुरुवात पासून शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो ..
वीट या बेटावर तो लहानाचा मोठा झाला..येथेच तो नौकानयन शिकला .गिर्यारोहणाची आवड ही येथेच निर्माण झाली .. स्वतःचे रक्षण करण्यासाठी कराटे शिकला.त्यानंतर तो ब्रिटिश एस.ए. एस. मध्ये दाखल झाला ..आधी सांगितल्याप्रमाणे येथील त्याचे ट्रेनिंगचे वर्णन वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची ,चिकाटी आणि सहनशक्तीची परिसीमा गाठून त्याने प्रशिक्षण पूर्ण केले..आफ्रिकेतील पॅराशूट अपघातात त्याची पाठ तीन ठिकाणी मोडली होती .यातून तो उठू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते पण तरीही केवळ अठरा महिन्यात त्यांचे आणि इतरांचे अंदाज चुकवत वयाच्या तेविसाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करतो .पण ही तर असामान्य धाडसाची केवळ सुरुवात होती..मग येथून सुरू झाले जेथे कोणीही जाऊ शकत नाही अश्या ठिकाणी जाणे . संकटांचा मुकाबला करीत जिवंत राहणे.प्रतिकुल परिस्थितीत निसर्गाशी जुळवून घेऊन जिवंत कसं राहायचं याबद्दल इतरांना सुद्धा सांगणे. त्याची ही धाडसे आपण MAN VS WILD या डिस्कव्हरी चॅनेलच्या कार्यक्रमात बघत आलेलो आहोतच..लहान मुलांपासून तर वृद्धापर्यत आज बिअर ग्रील्स ला सर्व ओळखतात त्याने आपल्या कार्यक्रमाने करोडो लोकांना भुरळ पाडली आहे..अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा ते भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इत्यादी अनेक दिग्गजांनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली आहे यातच बिअर ग्रील्स यांच्या कार्यक्रमाच व त्यांच्या मेहनतीचा यश आपण समजू शकतो..
लेखकांचा इथपर्यंत मजल मारण्याचा हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता.प्रत्येक गोष्टीत त्यांना संघर्ष करावा लागला.पण कधीही हार न मानता,संकटाना न जुमानता आपल्या मेहनत आणि जिद्दीने त्यांनी जो मुक्काम आपल्या आयुष्यात मिळवला आहे तो असंख्याना प्रेरणा देणारा आहे..सर्वांनी नक्कीच हे पुस्तक वाचावे आणि जिद्दीने, प्रेरणेने पेटून उठावे आणि आपल्या क्षेत्रातील बिअर ग्रील्स व्हावे ह्या शुभेच्छा...🔥🤘🏼
©️ Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा