माचीवरला बुधा 💜
दिवसागणिक जसे आजकाल भयानक दिवस येत आहे त्यामुळे कधीकधी आयुष्यात काहीच रोमांचित राहिलेले नाही असे विचार मनात दाटून येत आहेत..कोरोना,लॉकडाउन आणि वाढत्या मेहंगाईने सामान्य मानसाचं कंबरड मोडलं आहे..जनमानसात नैराश्य वाढलेलं आहे त्यामुळे कधीकधी जगायचं नेमकं कसं ?? हा प्रश्न मनात येऊन जातो..शहर,समाज सर्व सोडून दूर जंगलात कोठेतरी निसर्ग,प्राणी आणि पुस्तकांच्या सानिध्यात निघून जावं असं वाटायला लागते..बालपणापासूनच जेव्हापासून दूरदर्शनवर मोगलीची जंगल बुक ही Animated सिरीयल येत होती तेव्हापासूनच मला जंगल,प्राणी,पक्षी,झाडं-झुडपांची आणि त्यांच्या सानिध्यात राहायची आवड लागलेली आहे.पुढे जसजसे मी गौतम बुद्ध अभ्यासले,गुरू थोरो लिखित वॉल्डन वाचलं तेव्हा पासून तर माझी ही आवड खूप म्हणजे खूपच वाढली आहे..माझं नेहमीच एक स्वप्न आहे की आयुष्याच्या एका स्टेज नंतर सर्व काही सोडून एखाद्या छोट्याश्या खेड्यात लांब एक छोटीशी जमीन घेऊन तेथे एक छोटंसं घर बांधायचं आणि आयुष्यात संग्रही केलेले सर्व पुस्तके घेऊन तेथे वास्तव्याला जायचं..तेथे अनेक झाडे लावून त्यांचं संगोपन करायचं.शेकडो मांजरी, कुत्रे,बकऱ्या,कोंबड्या पाळायच्या आणि यांच्याच सानिध्यात राहायचं..शेती करायची,निसर्गाशी मैत्री करायची,निसर्गाशी एकरूप व्हायचं...
अशातच माझ्या नजरेत पडली एक छोटीशी ११२ पृष्ठसंख्या असलेली कादंबरी. ती कादंबरी म्हणजे गो.नी.दांडेकर लिखित "माचीवरला बुधा ही होय..
ही कादंबरी वाचून मी एवढं प्रभावित झालो की विचारूच नका.माझ्या स्वप्नाच्या दिशेने पुन्हा एक पाऊल पुढं मला या कादंबरीने भाग पाडलं..माझा निश्चय अजूनही खूपच ठाम या कादंबरीने झाला. शब्दांत व्यक्त करता येणार नाही एवढं आनंद मला ही कादंबरी वाचताना आणि वाचून पूर्ण केल्यावर झाला.मी जसा विचार करतो तसाच विचार कादंबरीतील मुख्य पात्र बुधा सुद्धा करतो याचं मला खूपच नवल वाटलं.या छोट्याश्या कादंबरीने मला खूप काही नवीन शिकवलं..कादंबरी वाचत असताना मीच बुधा होतो आणि मीच माचीवर जाऊन वास्तव्य करून आलो असा भास मला होत आहे..लेखकांची लेखणी आपल्याला त्यांच्या मोहात पाडते जी वाचत असताना आपण कोठेही थोडं सुद्धा बोअर होत नाही.कादंबरी समाप्त होऊच नये आणि आपण ती अशीच वाचत राहावं असं आपल्याला वाटते..
आपल्या सभोवताली सृष्टीशी एकरूप कसे व्हावे ??
छोट्या छोट्या गोष्टीनें आनंदीत कसे व्हावे ??
सुख म्हणजे नेमकं काय ??
आपण आयुष्याला जेवढं कठीण समजतो आयुष्य खरंच तेवढं कठीण आहे का ??
आपण जगताना जेवढ्यासाधनासाठी झटतो आपल्या तेवढ्या संसाधनाची गरज खरंच आहे का ??
मानवजातीलाच फक्त आपण आपलं मित्र-भाऊ बनवू शकतो का ??
इत्यादी शेकडो प्रश्नांची उत्तरे आपल्याला या कादंबरीतून मिळत जातात..ही कादंबरी वाचून आपल्या मनावर असलेलं दडपण,ताण तणाव एकंदरीत नाहीसा होऊन जातो.आपण जगण्याची व्याख्या जेवढी अवघड आणि किचकट करून ठेवली आहे .जगणं तेवढं कठीण आणि किचकट नाही याची प्रचिती ही कादंबरी वाचत असताना आपल्याला येते.नेमकं जगायचं कुठंवर आणि कशासाठी ??शेवटी मृत्यूश्येयवर शेवटच्या घटका मोजत असताना आयुष्यात आजपर्यंत काय केलं तर जगण्यासाठी संघर्ष केलंय बस्सस. गाडी,बंगला, अमाप पैसा कमवलंय पण आता तो आपल्या काय कामाचा ??हा विचार आपण कधी का करत नाही.बहुमूल्य जीवन एकदा मिळालं आहे तर त्याचा पुरेपूरं आनंद घ्यायचं,निसर्गाशी एकरूप व्हायचं कारण एकदा डोळे कायमचे बंद झाल्यावर हे सर्व आपल्याला कधीही आणि केव्हाही डोळ्याने दिसणार नाही किंवा हे सर्व अनुभवता येणार नाही हा साधा आणि सोपा विचार आपण का नाही करत ??
पण असे काही लोक सुद्धा असतात जो हा विचार करतात.इतरांपेक्षा वेगळा निर्णय घेऊन समाज आणि दुनियेची चिंता सोडून.आपलं शेवटचं काळ हा निसर्गाच्या सानिध्यात, प्राणी,पक्षी,झाडं झुडपं यांच्या सानिध्यात गेलं पाहिजे असा विचार करतात आणि निघून जातात एक आगळ्या वेगळया प्रवासाला.लोकं त्यांना वेडा-पागल समजतात पण त्यांना या गोष्टीनें शून्य फरक पडत असतो..त्यांना या वायफळ गोष्टींशी काही घेनदेणं नसतो त्यांना फक्त आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस सृष्टीशी एकरूप होण्यात घालावयाचे असतात.या अशाच माणसांपैकीच एक आगळा- वेगळा विचार करणारा आणि निसर्गाशी एकरूप होऊन शेवटची श्वास निसर्गातचं घेण्याची इच्छा दर्शवणारा बुधा..मुंबईसारख्या शहरात आयुष्य घालवणारा म्हातारं,अधू शरीर,कमजोर दृष्टी असलेला बुधा आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याचं निर्णय घेतो.आपल्या पूर्वजांच गाव माची हा गाव निवडून तेथील राजमाचीवरून दिसणाऱ्या टेमलाईचं पठारावर एक छोटीशी झोपडी बांधून वास्तव्य करतो..रोज तेथील निसर्ग न्याहाळत तो आपला दिवस मजेत आणि आनंदात घालवतो.भाताची शेती करून तो भात पिकवतो..येथे तो एकटा नसतो तर त्याचे सोबती सुद्धा त्याच्या सोबत असतात जे नकळत बनत जातात..या निर्मनुष्य पठारावर त्याचे सोबती म्हणजे कोण ??तर त्याच्या सोबत नेहमी असणारा त्याचा कुत्रा,झोपडीच्या बाजू उभा असलेला उंबरबाबा,उंबरावर राहणारी खारूताई आणि त्याचं कुटुंब,पाळलेली बकरी आणि त्याचे पिल्ले,घराबाहेर लावलेली आवळीबाई आणि इतर...या आपल्या मित्रांबद्दल त्याच्या मुलाला समजवताना बुधा जो म्हणतो तो आपल्या डोळ्यात अंजन घालणार आहे.
तो म्हणतो "
“ भिव्या , आर , तू मघा म्हंगालास , का बिरान्या गावाचा गोतावळा गोळा क्येला ! ल्येकरा , हाये त खरंच ! पर आसं पघ , का घागरताई , आन् उंबरबाबा , दोघंबी कधी धडूत मागाया येत न्हाईत , का ज्यावाय ! धिलं न्हाई , म्हनून रुसत न्हाईत ! उंबरबाबा आपली शितळ सावली मातर रातदीस झोपडीवर धरून हुबा हाये ! असा बंदुराजा कुटं मिळंल का ? आ ? " भिव्यानं यावर फक्त एक जांभई दिली . पुन्हा बुधा बोलू लागला , " मुंबईच्या मानसांना काय करीतोस ! आरं , कुनीबी कामाला यायचा न्हाई ! पैका हाये , तवर समदे बुधादा बुधादा करीतील ! त्यो संपल्याबरुबर कुनी वळखबी दावायचा न्हाई ! तुकारामबावानं सांगितलं , जन हे सुकाचे दिल्याघेतल्याचे , अंत बा काळीचे कुनी न्हाई , त्यांच्यापरीस उंबरबाबाच्या सावलीत व्हावं , आवळीबाईचा श्येजार असावा-💜
बाकी कादंबरी वाचत असताना आपण असंख्यवेळा अंतर्मुख होतो तर आयुष्याबद्दल पुन्हा एकदा नव्याने विचार करतो..कादंबरीतील अनेक प्रसंग वाचत असताना आपण निःशब्द होतो..ठराविक वेळेत जाणाऱ्या विमानाची वाट पाहत बसणं,डोंगरखाली आलेल्या सैनिकांची वरूनच विचारपूस करून खुश होणं इत्यादी अनेक बुधाचे दिनक्रम वाचून आपण बुधाच्या आणि या कादंबरीच्या प्रेमात पडतो...त्यामुळे नक्कीच वाचा आणि इतरांना सुद्धा सुचवा..💜
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा