बुद्धांच्या_संस्कारक्षम_गोष्टी 💜



काही दिवसांपूर्वी मी एक पुस्तक वाचलं आणि ते वाचून खूप प्रभावित झालो.ते पुस्तक मी अनेक लेकरांना वाचून दाखवलं त्यामधील उत्कृष्ट गोष्टी सांगितल्या आणि त्या अनेक लेकरांना आवडल्या हे विशेष.त्या पुस्तकाच्या ५ प्रति मागवून मी चार प्रति वेगवेगळ्या समाजातील ४ मुलांना सप्रेम भेट म्हणून सुद्धा दिल्या.त्यामुळे अनेक दिवसांपासून त्याबद्दल लिहायचं होत पण मी आजच्या दिवसाचीच वाट बघत होतो..आज विशेष बौद्ध पौर्णिमा निमित्त त्या छोटेखानी पुस्तकाबद्दल माझ्या मनातील दोन शब्द लिहितोय...ते पुस्तक म्हणजे सागर शिंगणे लिखित "बुद्धांच्या संस्कारक्षम गोष्टी (सचित्र) हे ५६ पृष्ठसंख्या असलेलं पुस्तक होय..
444
या पुस्तकात डॉ.आ.ह साळुंखे लिखित "सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध "या ग्रंथातील निवडक व संस्कारक्षम ११ गोष्टींचे संपादन केलेले आहे.. या ११ अकरा निवडक गोष्टीतून आपल्याला तथागत बुद्धांचे विचार समजतात.प्रत्येक गोष्टींतून काहीतरी उत्कृष्ट शिकवण मिळते..बुद्धांचे उपदेश,त्यांच्या जीवन चरित्रातील वेगवेगळ्या गोष्टींवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असताना या पुस्तकाची गरज का पडली त्यावर लेखक म्हणतात की

 " बुद्धांच्या जीवनातील प्रसंगांचे , उपदेशांचे वर्णन करणाऱ्या अनेक बोधकथा प्रसिद्ध आहेत. पण यापैकी बऱ्याच गोष्टी विविध चमत्कारांनी भरलेल्या आहेत . वैज्ञानिक कसोट्यांवर न टिकणारे , निसर्गनियमांच्या विरोधात जाणारे कुठलेही चमत्कार बुद्धांना मान्य नव्हते . मानवी जीवन अधिकाधिक सुखी करण्यासाठी आपल्या वागणुकीतील बदल महत्त्वाचा आहे ,अशी त्यांची शिकवण होती. मग बुद्ध चमत्कार कसे करू शकतात ?? असा प्रश्न मला सतत अस्वस्थ करायचा . कमीतकमी लहान मुलांसमोर तरी बुद्धांच्या अशा अवैज्ञानिक , चमत्कारिक गोष्टी येऊ नयेत , असं मला वाटायचं . याबद्दल एकदा मी डॉ . आ . ह . साळुखे सरांशी बोललो . बुद्धांच्या चरित्रातील निसर्गनियमांच्या विरोधात न जाणाऱ्या गोष्टी लिहून त्या सर्वांपर्यंत पोहचाव्यात , यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे , असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता . त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून अनेक नव्या गोष्टी उलगडत गेल्या आणि हे पुस्तक लिहिणं , ही आपली जबाबदारी आहे , असं मला वाटलं..

लेखकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच या पुस्तकातील एकही गोष्ट अवैज्ञानिक किंवा चमत्कारिक नसून प्रत्येक गोष्ट ही मानवाच्या बुद्धीच्या कसोटीवर टिकणारी आहे..सोप्या आणि एकदम साध्या भाषेतील या गोष्टींत आपल्याला जीवनाच्या अनेक प्रश्नांचे उत्तरे नकळत मिळत जातात.विविध प्रसंगातील बुद्धांचे उपदेश योग्यरीत्या या पुस्तकातून काही उत्कृष्ट चित्रांच्या साह्याने चित्रित केलेलं आपल्याला दिसते.बुद्धांनी त्यांचे बहुतांश उपदेश हे पाली भाषेत केल्यामुळे अनेक ठिकाणी पाली शब्द जसेच्या तसे लेखकांनी वापरले आहेत आणि कठीण वाटणाऱ्या शब्दांचे अर्थ प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी उत्कृष्ट पद्धतीने दिलेले आहे..

ओळख बुद्धांची 
सात आंधळे आणि हत्ती
 कष्टाला पर्याय नाही
 राग माणसाचा शत्रू आहे
 एकता ही शक्ती आहे 
अंगुलिमाल कसा बदलला ? 
मौल्यवान काय ? 
उपाली आणि शाक्य तरुणांची दीक्षा 
निंदा ही सुधारणेची संधी 
मालुक्यपुत्ताचा प्रश्न 
ज्ञान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे
 मुलगा - मुलगी एकसमान

इत्यादी गोष्टीतुन आपल्याला विज्ञान आणि पर्यावरवादी बुद्ध समजतो,उमजतो...शेवटी बुद्धांचे सर्वोत्कृष्ट विचार बालमनावर कोरण्यात या संपादनाचा थोडा जरी उपयोग झाला तरी लेखकांना अपार आनंद होईल अशी इच्छा लेखक व्यक्त करतात..त्यामुळे सर्वांनी हे छोटेखानी पुस्तक वाचावे आणि लहान मुलांना भेट म्हणून द्यावे..
लेखकांना_मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💜

बौद्ध पौर्णिमेच्या अनेक मंगलमय शुभेच्छा सर्वांना 💜🤘🔥💐

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼